हिमायतनगर (अनिल मादसवार) संकष्ट चतुर्थीच्या पवित्र दिवशी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील गणेश मंदिरात भक्त गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होतात. मात्र, यावेळी एक विलक्षण घटना घडली. चक्क बजरंगबलीच्या अवतारातील वानर रुपी वन्य प्राणी गणेश मंदिरात दर्शनासाठी आला. मंदिरात आलेल्या या वानराने गणरायाचे दर्शन घेतल्याचे पाहून उपस्थित भाविक आश्चर्यचकित झाले.


या अनोख्या प्रसंगामुळे मंदिर परिसरात काही काळ गर्दी झाली. अनेकांनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. भक्तांनी याला भगवान हनुमानाचे आगमन मानत त्याचा मंगल संकेत म्हणून स्वीकार केला. चक्क हनुमंताने गणरायाचे दर्शन घेऊन मोदकाचा प्रसाद खाल्ला, या घटनेमुळे संकष्ट चतुर्थीचे औचित्य अधिकच पवित्र व भक्तिरसपूर्ण झाले.


गणपती बाप्पा मोरया … जय बजरंगबली … अश्या घोषणा उपस्थितांनी दिल्यानंतर वानर रुपी वन्य प्राणी गणेश मंदिरातुन मार्गस्थ झाले. यावेळी उपस्थितांनाही वानर रुपी हनुमंतरायाने गणरायाचे दर्शन घेतल्याचे पाहून उपस्थित भाविक आश्चर्यचकित झाले होते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे संकटमोचन हनुमानरायाने दर्शन घेतल्याने शहरातील भाविक भक्तात दिवसभर कुतूहलाचा विषय ठरला होता. यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, प्रवीण कोमावार, पंडित ढोणे आदींसह शालेय विद्यार्थी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.




