हिमायतनगर, अनिल मादसवार| सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी हिमायतनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. पहिल्यांदाच झालेल्या एवढ्या मोठ्या पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठावरील तसेच मोठमोठ्या नाल्याच्या काठावरील हजारो हेक्टर जमिनीतील सोयाबीन, कापसासह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. आत्तापर्यंत शासनाने या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तातडीने मदत द्यायला हवी होती. केवळ घोषणाबाजी करून वेळ काढूपणा करत अद्यापही याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी सणासुदीच्या काळात आर्थिक संकटात सापडले आहेत. उद्या सोमवारीं नांदेड मध्ये येणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी कोणतेही पंचनामे अहवालाची वाट न पाहता तातडीने या संदर्भात ठोस निर्णय घेऊन हदगाव – हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी अशी मागणी डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी केली.
हदगाव – हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीने शेतकरी हतबल झाल्याचे समजल्यानंतर धीर देण्यासाठी पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्षा डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी पडूहकार घेतला. यासाठी क्षणाचाही विलंब न करता गेल्या तीन दिवसापासून मतदार संघातील पैनगंगा नदीकाठावरील नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केले. आणि नुकसानी याबाबतच सचित्र अहवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवीत आहेत. त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील जवळपास 30 गावांमध्ये भेटी देऊन नुकसानग्रस्त पिकाची पाहणी केली आहे. या ठिकाणी पिकांची परिस्थिती पाहून त्या थक्क झाल्या असून, अक्षरशा पुराच्या पाण्याने पिकांचा चिखल झाला असल्याचे चित्र दिसून आल्याचे नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. अतिवृष्टीच्या पुरामुळे गाळ साचून जमिनीचा पोत देखील खराब झाला असून, आगामी पाच वर्ष या जमिनीतून एक रुपयाचे देखील उत्पादन होऊ शकणार नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून कमीत कमी हेक्टरी ५० हजाराची मदत शेतकऱ्यांना देणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीची सरसकट मदत देऊ असे सरकारकडून सांगितले गेले. गणरायाचे आगमन झाले आता गौराई देखील दोन दिवसात येणार आहे. असे असताना शासनाने अद्याप शेतकऱ्यांना मदत देणे तर दूरच…. अजून किती मदत करणार हे देखील जाहीर केले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात अंधकार पसरल्याचे दिसून येत आहे. हिमायतनगर तालुक्यातील तीन मंडळात आणि शहरात नांदेड जिल्ह्यातून सर्वात मोठा पाऊस झाला. मात्र अजूनही एक मंडळ सोडले तर बाकी मंडळातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे काम केले जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नुकसाणीच्या बाबतीत शासनाच्या अधिकाऱ्यांनी मदत मिळून देण्यात कोणताही भेदभाव न ठेवता सर्वाना अतिवृष्टीचे मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका घ्यायला हवी तर सर्वाना मदत मिळेल नाहीतर मागील काळाप्रमाणे कुठे दहा हजार तर कुठे शंभर रुपये असे होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
आज रविवारी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्षा डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी पैनगंगा नदीकाठावरील बोरगडी, तांडा 1, तांडा 2, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, तसेच मोठ्या नाल्याच्या काठावरील खैरगाव ज, वडगाव ज, सिबदरा, कारला या गावात भेटी देऊन नुकसानीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी हिमायतनगर तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर भेट तर दिलीच नाही. मात्र शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्याकडे मागील अनेक वर्षाप्रमाणे याही वर्षी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच मागील वर्षी अतिवृष्टीसह पिकविम्याची नुकसान भरपाई मिळून देण्यात मोठा भेदभाव करण्यात आल्याची व्यथा अनेक गावातील नागरिकांनी डॉ. रेखाताई चव्हाण यांच्यासमोर कथन केली. यावेळी थेट तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांच्याशी डॉ. रेखाताई चव्हाण यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून नदी नाल्याच्या काठावरील नुकसानी बाबत काय..? पाऊले उचलण्यात आली याबाबतची विचारणा केली. तसेच आपल्या तहसील कार्यालयाकडून शासनाला अहवाल पाठविताना सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न करावे असे सूचित केले. तसेच शासनाकडून देण्यात येणाऱ्या अतिवृष्टीच्या मदतीमध्ये मागील वर्षप्रमाणे कोणासोबत भेदभाव होणार नाही ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत मिळावी या मागणीसाठी सोमवार दिनांक ०९ सप्टेंबर रोजी दुपारी नुकसानग्रस्त भागातही शेतकऱ्यांसह तहसीलदार टेमकर यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.95
पिकांचा चिखल झालेल पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळयातून अश्रू येताना मी पहिले – डॉ.रेखाताई चव्हाण
नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौऱ्या संदर्भात महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा तथा नांदेड जिल्ह्याच्या प्रभारी अध्यक्षा डॉ.रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्याशी विचारला केले असता त्या म्हणाल्या कि, मी मागील काही दिवस हदगाव तालुक्यात नदीकाठच्या गावचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर भेट दिली. तसेच गेल्या 3 दिवसापासून हिमायतनगर तालुक्यातील नदी नाल्याच्या काठावरील गावात फिरत आहे. आत्तापर्यंत हिमायतनगरच्या २४ गावात भेटी दिल्या असून, नुकसानीची आकडेवारी सांगणे कठीण आहे. अधून मधून दररोज मध्यरात्री व दिवसा धो धो पाऊस होत असल्याने जमिनीतील पाणी बाहेर निघायला मार्ग नाही. परिणामी उर्वरित पिकांची अवस्था देखील बिकट होत असून, अगोदर पाण्याखाली आलेल्या पिकांचा अक्षरशा चिखल झाला आहे. पळसपुर, डोल्हारी, सीरपल्ली, शेलोडा, एकंबा, कोठा, कोठा तांडा, सिरंजनी, कामारी, पिंपरी, विरसनी, वाघी, दिघी, टेंभूर्णी, बोरगडी, तांडा 1, तांडा 2, धानोरा, वारंगटाकळी, मंगरूळ, खैरगाव ज, वडगाव ज, सिबदरा, कारला यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत विदारक दिसून आली आहे. अतिवृष्टीने चिखल होऊन बेचिराख झालेली पिके पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळयातून अश्रू येताना मी पहिले आहे. म्हणून तातडीने शासनाने हिमायतनगर – हदगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट ५० हजारांची मदत देऊन या नैसर्गिक संकटातून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.