हिमायतनगर,अनिल मादसवार| लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा शोधण्यासाठी आणि मतदार पुनर्निरीक्षणाच्या अनुषंगाने हिमायतनगर येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. या बैठकीत आगामी काळात होऊ घातलेली हदगाव – हिमायतनगर विधानसभा हि भाजपच्या वाट्याला सोडण्यात यावी अशी मागणी अनेक वर्षांपासून भाजपात एकनिष्ठेने काम करणारे गजानन तुप्तेवार यांच्यासह बैठकीला उपस्थित अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच पक्षाने संधी दिल्यास आपण हि विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे मत गजानन तुप्तेवार यांनी बोलुंन दाखवले आहे. त्यांच्या या मागणीला बैठकीला उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी समर्थन दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वाना लागले आहे. सर्वच पक्षाचे पदाधिकारी विधानसभा कशी जिंकता येईल यासाठी आढावा व नियोजन बैठक घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दि.६ जुलै शनिवार रोजी हिमायतनगर येथे येथील शासकीय विश्रामगृहात भाजपाचे पदाधिकारी व बूथ प्रमुखांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला बूथ सक्षमीकरण मराठवाडा संयोजक प्रवीण साले, भाजपाचे नांदेड जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष सुधाकर कदम, जिल्हा संयोजक बाबुराव केंद्रे, प्रदेश सदस्य शेखर पाटील हदगाव, वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक डॉ.प्रसाद डोंगरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, साहेबराव देशमुख, व्यंकटेश लोणे, तुकाराम चव्हाण, राजू मोरे, विधानसभा संयोजक चंद्रशेखर कदम, व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष शिरीष मनाठकर, जिल्हा सरचिटणीस लताताई फाळके, गजानन तुप्तेवार, आशिष सकवान, भागवत देवसरकर, तात्याराव पाटील, निळू पाटील, गजानन चायल आदींसह जिल्ह्याचे अनेक पदाधिकारी व हदगाव – हिमायतनगर येथील महिला – पुरुष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला जनसंघाचे संस्थापक डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आगामी काळात होणाऱ्या हदगाव विधानसभा निवंडुकीत सार्वधिक मताधिक्य मिळविण्यासाठी बूथ प्रमुखांनी ग्राउंड लेव्हलवर काम करावे. तसेच नवमतदार आणि मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण करून मयताचे नावे वगळून नव मतदारांची नोंदणी करून मतदानाची टक्केव्वारी वाढविण्यावर भर द्यावा अश्या सूचना उपस्थितांना मार्गदर्शन करताना बूथ सक्षमीकरण मराठवाडा संयोजक प्रवीण साले यांनी केल्या. यावेळी आगामी निवडणूक जिंकण्यासाठी हदगाव विधानसभा मतदार संघ भाजपला सोडण्यात यावा अशी मागणी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी बैठकीत मागिल अनेक वर्षांपासून भाजपमध्ये एकनिष्ठेने कार्यरत असलेले गजानन तुप्तेवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगून पक्षाने मला संधी दिल्यास मी निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे सांगितले.
हिमायतनगर येथे जेष्ठ भाजपचे कार्यकर्ते तथा स्वर्गीय प्रकाशअण्णा तुप्तेवार यांनी तत्कालीन जिल्हाध्यक्ष संभाजी पवार, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पांडे यांच्यासोबत राहून भाजपला हिमायतनगर तालुक्यात वाढविण्याचे काम केले होते. त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेऊन त्यांचे सुपुत्र गजानन तुप्तेवार हे अनेक वर्षांपासून आमदार राम पाटील रातोळीकर व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एकनिष्ठेने भाजपचे कार्य करत आहेत. गजानन तुप्तेवार हे पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष निवडून येऊन उपसभापती पदी विराजमान झाले होते. अनेक पक्षांनी त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला मात्र ते भाजपाशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात सत्तेच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदावर गजानन तुप्तेवार याना बसविले होते. तत्पूर्वी हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदावर काम करताना त्यांनी भाजपचे संघटन वाढविण्याबरोबर विचारधारा पुढे नेण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल, जनमानसात असलेली प्रतिमा आणि सर्वसामान्य लोकासांठी असलेली त्याची धडपड लक्षात घेता हदगाव – हिमायतनगर विधानसभा भाजपाला सोडून गजानन तुप्तेवार याना उमेदवारी देण्यात यावी असे मत रामदास रायपलवार यांनी व्यक्त केले.
कारण दोन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या हदगाव – हिमायतनगर मतदार संघ १९९० साली भाजपाला सोडण्यात आला होता. तेंव्हापासून हा मतदार संघ मित्रपक्षाला सोडला जात आहे. परंतु मागील दशकाचा कार्यकाळ पाहता मित्रपक्षाने हि जागा दोनदा गमावली आहे. देशात व महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आहे, नुकत्याच संपन्न झालेल्या २०२४ ची लोकसभा निवडणूकिची उमेदवारी मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटाला देण्यात आली होती. हि जागा निवडून आणण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी जीवाचे रान केले, मात्र यात पराभव झाला असला तरी हदगाव – हिमायतनगर विधासभा मतदार संघात मताधिक्य वाढविण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे आगामी काळात होणारी विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ भाजपच्या वाटेल सोडणे आवश्यक असून, विधानसभेवर झंडा नक्कीच फडकेल असे मत इच्छुक उमेदवार गजानन तुप्तेवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.