लोहा | गुराखी, मेंढपाळ व नाहिरे वाल्या समाजाच्या जिभेवरचे मौखिक साहित्य, त्यांची संस्कृती व परंपरा जगासमोर यावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेले जागतिक गुराखी साहित्य संमेलन यंदा ३१ व्या वर्षात पदार्पण करत असून, लोहा शहरालगत असलेल्या ऐतिहासिक गुराखीगडावर २६ ते २८ जानेवारी या कालावधीत ते उत्साहात संपन्न होणार आहे.


या संमेलनाची मुहूर्तमेढ १९९१ साली भाई केशवराव धोंडगे यांनी रोवली. त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव ॲड. मुक्तेश्वर धोंडगे आणि प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांनी हा साहित्याचा वसा अखंडपणे पुढे चालवला आहे. संमेलनाचे उद्घाटन पोहरादेवी संस्थानचे महंत परमपूज्य बाबूसिंह महाराज यांच्या हस्ते होणार असून, माजी आमदार गोविंदअण्णा केंद्रे हे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभणार आहेत.

या संमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे, ॲड. मुक्तेश्वर धोंडगे, सुप्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव, शाहीर दामोदर वजीरगावकर यांची उपस्थिती लाभणार आहे.


दिनांक २६ जानेवारी : गुराखी साहित्य संमेलनाचे उद्घाटन, दिनांक २७ जानेवारी : विविध कलागुण दर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम, दिनांक २८ जानेवारी : खुले अधिवेशन, समारोप व पारंपरिक गुराखी काल्याचे वाटप अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे. उपेक्षित गुराखी, मेंढपाळ व नाहिरे वाल्या समाजातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या साहित्यिक योगदानाचा गौरव व्हावा, या उद्देशाने हे संमेलन भरवले जात आहे.

हे संमेलन श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार, श्री शिवाजी ग्रामीण विद्यापीठ, कंधार आणि हम सब एक है गुराखी पीठ, कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असून, आयोजक संस्थेचे अध्यक्ष गडपती प्रा. पुरुषोत्तम धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे. संस्थेचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथराव कुरुडे आणि सहसचिव ॲड. मुक्तेश्वरराव धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. गुराखी साहित्य संमेलनात नाहिरे वाल्या, उपेक्षित, अक्षरओळख नसलेले गुराखी राजा व मेंढपाळ राजा यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

