Gunthewari in rural areas will get extension: Revenue Minister Bawankule has positive discussions with MLA Anandrao Bondharkar नांदेड। ग्रामीण भागातील गुंठेवारी बंद असल्यामुळे जमिन खरेदी-विक्रीचे सगळे व्यवहार ठप्प आहेत . यातून अनेक समस्या निर्माण झाले असल्याने मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी ग्रामीण भागातील गुंठेवारीला मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आ. आनंदराव बोंढारकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. या मागणीबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आ. बोंढारकर यांच्याशी सकारात्मक चर्चा केली असून ही मुदत वाढ लवकरच मिळेल असा विश्वास आ. बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे.


विधानसभेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज आ. बोंढारकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी सादर केले. ग्रामीण भागातील गुंठेवारीला २२ ऑगस्ट २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. त्यानंतर तब्बल दोन वर्षाचा कालावधी लोटत आला असतानाही अद्यापही ग्रामीण भागातील मालमत्तांना मुदतवाढ देण्यात आलेली नाही.

त्यामुळे मालमत्ता खरेदी विक्रीचे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहे यातून ग्रामीण भागातील मालमत्ता धारकांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीस भरण्यासाठी , मुलींचे लग्न करण्यासाठी आणि दैनंदिन व्यवहारात आवश्यक असणाऱ्या व्यवहारासाठी आणि पैशासाठीही मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असल्याने ग्रामीण भागातील मालमत्ता असून अडचण नसून खोळंबा ठरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी गुंठेवारी मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आ.बोंढारकर यांनी केली आहे.


दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अनुषंगाने सकारात्मक पावले उचलली असून गुंठेवारीला मुदत वाढ देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागाला कळविले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच ग्रामीण भागातील गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लागून मालमत्ता धारकांना मोठा दिल्यास मिळेल असा विश्वास ही आ. बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे.


