नांदेड। वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे मृत्युमुखी पडलेले वडिल गोपालसिंह ठाकूर यांचे मरणोपरांत नेत्रदान करून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी समाजाला नविन दिशा दिली आहे.गोपालसिंह भैय्या यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


सोमवारी संध्याकाळी एसटी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष गोपालसिंह यांचे निधन झाले. दिलीप ठाकूर यांनी डॉ.चव्हाण, प्रगती निलपत्रेवार यांच्याशी नेत्रदानासाठी संपर्क साधला. कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश पडावा यासाठी नेत्रदान करण्याची इच्छा व्यक्त केली. एवढ्या वयस्क व्यक्तीचे नेत्रदान करण्याची पहिलीच वेळ असल्यामुळे शंकरराव चव्हाण रुग्णालय विष्णुपुरी येथील तज्ञ डॉक्टरांनी ६ तासाच्या आत नेत्र काढण्याचे सोपस्कार पूर्ण केले.


मंगळवारी संध्याकाळी मिल रोड येथील निवासस्थानापासून निघालेल्या अंत्ययात्रेत अनेकजन सामील झाले होते. राजेशसिंह यांनी मुखाग्नी दिला. त्यानंतर झालेल्या शोकसभेत प्रवीण साले, कामगार नेते डी.आर. पाटील, ॲड. सी.बी.दागडिया, कल्याणसिंह काथी, शशिकांत भुसेवाड, रमेश डागा , सुरेश लोट, रामेश्वर वाघमारे, ॲड. प्रशांत अवधीया यांनी आपल्या भाषणातून गोपालसिंह यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.ॲड. दिलीप ठाकूर, दीपकसिंह, दिनेशसिंह, राजेशसिंह यांचे सांत्वन केले. विविध राजकीय, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, एसटी कर्मचारी व अधिकारी, पत्रकार, मिलरोड परिसरातील नागरिक, मित्र परिवार व आप्तेष्ट यांच्या सह मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होते.वय झालेल्या व्यक्तींचे नेत्रदान करता येत नाही हा जो समाजात गैरसमज होता. तो ठाकूर कुटुंबाच्या पुढाकारातून दूर होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.
