नांदेड | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भारत पातळीवरील नामांकित भारतीय फिल्म व टेलीव्हिजन संस्था (एफटीआयआय) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या एक आठवड्याच्या कार्यशाळेचा समारोप माध्यमशास्त्र संकुलामध्ये अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला. या समारोपीय सत्राला विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. शैलजा वाडीकर, डॉ. रमेश ढगे, प्रा. राहुल गायकवाड यांची उपस्थिती होती.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते सोमवार दि. २१ रोजी या कोर्सचे उद्घाटन करण्यात आले होते. दिल्ली, ग्वालियर, मुंबई, पुणे, बिकानेर, अमरावती, सातारा इत्यादी ठिकाणावरून या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थी विद्यापीठात दाखल झाले होते. स्मार्टफोनचा वापर करून देखील उत्तम फिल्म निर्मिती करता येते हे प्रात्यक्षिकासह या कार्यशाळेत शिकविण्यात आले. एफटीआयआयचे कोर्स संचालक श्री. रितेश ताकसांडे यांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून या सहा दिवसीय कार्यशाळेत सहा लघु चित्रपटांची निर्मिती केली.
माध्यमशास्त्र संकुलात आयोजित या कार्यशाळेत स्मार्टफोनच्या विविध सेवा-सुविधेची अगदी बेसिकपासूनची तांत्रिक माहिती देण्यात आली. प्रकाशाचा योग्य वापर, कमीत-कमी वेळात आणि अल्प साधनांचा वापर करून उत्कृष्ट फिल्म बनवता येते याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात आले. स्मार्टफोन पकडण्याची पद्धत, फोटो आणि व्हिडिओ कसा शूट करावा आणि त्यावर नंतर कसे संस्कार करावेत याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात आली. स्मार्टफोन फिल्मच्या निर्मितीतील कथा, पटकथा, संवाद, ठिकाणांची निवड, पात्रांची निवड आणि अॅक्टिंग, स्मार्टफोनवर शूटिंग, संपादन आदी सर्व प्रक्रिया प्रशिक्षणार्थ्यांनी केल्या. सहभागी प्रशिक्षणार्थ्यांनी एकूण सहा फिल्म निर्माण करून समारोपीय सत्रात त्या मान्यवरांच्या उपस्थितीत पडद्यावर दाखवल्या. मराठवाड्यातील मुलांमध्ये गुणवत्तेची कमतरता नाही, कलेच्या क्षेत्रात ते खूप पुढे जाऊ शकतात. या सारखे आणखी कोर्स विद्यापीठाने आयोजित करावेत, अशी अपेक्षा श्री. रितेश ताकसांडे यांनी व्यक्त केली.
कोर्सला मिळालेला प्रतिसाद उत्साह वाढविणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून संकुलातील सर्व संसाधनांचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम, के. पाटील यांनी केले. याप्रसंगी आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन नरंगले यांनी तर डॉ. सुहास पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दीपक शिंदे, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले, प्रा. गिरीश जोंधळे, प्रा. प्रज्ञाकीरण जमदाडे, साहेब गजभारे, गफार सय्यद, महिंदर दुलगच आदींनी परिश्रम घेतले.