नांदेड। जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील माजी सरपंच, माजी चेअरमन, हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान संचालक डॉ. प्रकाश विठ्ठलराव वानखेडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी करण्यात आली आहे. सदर नियुक्तीचे पत्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बि. आर. कदम, यांच्या हस्ते दिनांक १ आगस्ट रोजी देण्यात आले आहे, त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातील नागरिकांतून त्यांचे अभिनंदन केले जाते आहे.
एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून काम करत असताना न्याय मिळाला नसल्याने शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षामध्ये 15 वर्षांपूर्वी प्रवेश करून डॉक्टर प्रकाश वानखेडे यांनी एक निष्ठेने काँग्रेसचे काम केले आहे. काँग्रेसमध्ये काम करताना त्यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाली होती. यातही त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळण्याजोगे काम करून काँग्रेस पक्षामध्ये प्रतिष्ठा वाढवली. तसेच प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षाचे इमान इतबारे काम केले आहे. त्यांनतर पदांवर काम करताना कोणतीही अपेक्षा न ठेवता कार्य केले. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेऊन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीने त्यांची निवड जिल्हा उपाध्यक्षपदी केल्यामुळे एका निष्ठावंत कार्यकर्त्याला जिल्हास्तरीय काम करण्याचा मान मिळून दिला आहे.
त्यांची या पदावर निवड होण्यासाठी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशी वरून जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी निवड केली आहे. याप्रसंगी हदगाव- हिमायतनगर किनवट-माहुर विधानसभेचे जिल्हा कार्याध्यक्ष, माजी जि.प. सदस्य सुभाष राठोड, उत्तर कार्याध्यक्ष बालाजी पाटील चव्हाण, हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, हदगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष किशोर कदम रुईकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड, सरपंच संघटना हदगाव तालुका अध्यक्ष सिताराम पाटील फळीकर, उपाध्यक्ष बालापाटील टाकराळेकर आदिची ऊपस्थीती होती. डॉ. प्रकाश वानखेडे यांच्या नियुक्तीची बातमी हिमायतनगर तालुक्यात समजताच त्यांच्या चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.