नांदेड| निवडणुकीतील पराभवाचे शल्य काही काळ बाजूला ठेवत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे व माजी जि.प. सभापती संजय बेळगे हे ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्य पथावर होणाऱ्या भव्य व नेत्रदीपक परेडचे साक्षीदार ठरत आहेत.


अलीकडेच झालेल्या नगरपालिकेच्या तसेच नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या तिन्ही काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र त्या राजकीय अपयशाने खचून न जाता, ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा आनंद हे तिघेही घेत आहेत.

२६ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या राष्ट्रध्वजारोहणानंतर कर्तव्य पथावर सादर होणारी भव्य परेड जगभरात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. हा अविस्मरणीय सोहळा प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य या तिन्ही मित्रांना लाभले असून, त्यासाठी जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी विशेष पासेस उपलब्ध करून दिले आहेत.


जिल्हा परिषदेच्या राजकारणात सुमारे बारा वर्षांपूर्वी दिलीप पाटील बेटमोगरेकर यांचा राजकीय “बेट” भक्कम मानला जात होता. कालांतराने राजकीय परिस्थिती बदलली आणि दिलीप पाटील व संजय पाटील कऱ्हाळे यांना सत्तेबाहेर राहावे लागले. तरीही या तिघांचा संघर्ष आजही सुरू असून, क्रिकेटमधील खेळाडूच्या ‘बॅड पॅच’प्रमाणे हा टप्पा असल्याची भावना त्यांच्या समर्थकांत व्यक्त होत आहे.

एलबीटी–२ ब्रिज (गंगा) विभागात आसन व्यवस्था असलेल्या या परेडमध्ये सहभागी होत, राष्ट्रध्वजारोहण व त्यानंतरची भव्य संचलन पाहण्याचे स्वप्न अनेकांचे असते. ते स्वप्न या तिन्ही काँग्रेस नेत्यांसाठी यंदा साकार होत असून, हा अनुभव त्यांच्या राजकीय व वैयक्तिक आयुष्यात नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे.

