नांदेड (प्रतिनिधी) मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला मोठा पूर आला आहे. वरच्या प्रकल्पांतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे तब्बल १६ दरवाजे उघडण्यात आले असून दोन लाख क्युसेसहून अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.



यामुळे बुधवारी सकाळपासून शहरालगतच्या नदीकाठच्या बहुतांश भागांना पुराने वेढा घातला. गोवर्धन घाट, नावघाट पूल पाण्याखाली गेले असून वाघी रस्ता, सैलाब नगर, खडकपुरा, गाडीपुरा, पंचवटी नगर, जुन्या पुलालगतचा देगलूर नाका परिसर जलमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



पंचवटी नगरात अडकलेली एक वृद्ध महिला, तिचा मुलगा व २३ पशुधन यांना मनपा अग्निशमन दलाने बोटीच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान, प्रशासनाने आधीच नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केले होते; परंतु अनेक कुटुंबे शेवटच्या क्षणापर्यंत घरातच थांबली. पूरपाणी शिरू लागताच लोकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली.



धोका कायम : सध्या गोदावरी नदीची पातळी इशारा पातळी ३५१.०० मीटर ओलांडली असून ती ३५४.० मीटर गाठण्याची शक्यता आहे. पुढील काही तासांत विष्णुपुरी प्रकल्पाचा विसर्ग वाढून अडीच ते तीन लाख क्युसेस होण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबई–नांदेड वंदे भारत एक्सप्रेसला बसला असून ती गाडी अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. तर शहरातील दुलेशाह नगर परिसरात शेख मिन्हाज (१४) या मुलाचा पूरपाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.



