नांदेड| नांदेड जिल्ह्यात युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वराज्य पक्षाच्या आयोजनात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी असूड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नांदेड येथून झाली आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समाप्त झाला. या मोर्चात शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या सरकारच्या कानावर घालण्यात आल्या, ज्यात पिकांचे भाव, नुकसान भरपाई आणि विविध योजनांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता.
या मोराचातील मुख्य मागण्या सोयाबीनसाठी ₹8,500 प्रति क्विंटल दर मिळावा, कापूससाठी ₹11,000 प्रति क्विंटल दर मिळावा, ऊसासाठी ₹3,500 प्रति टन दर मंजूर करावा, तिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 72 तासांच्या आत देण्याचे आश्वासन दिले असताना अद्याप ती देण्यात आलेली नाही, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, प्रधानमंत्री आवास योजनेखाली ज्यांचे घर ढासळले आहे त्यांना ₹3 लाख नुकसानभरपाई मिळावी, पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई दिली जावी, ज्या शेतकऱ्यांचे 100% पिकांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या मुलांना शैक्षणिक सुविधा व अनुदान देण्यात यावे, जिल्ह्यात सुरू असलेल्या फुल शेती प्रकल्पांना पूर्णत्वास न्यायचे आहे, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, विशेषतः ज्या शेतकऱ्यांचे 100% पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी कन्यादान योजनेखाली शासकीय मदत देण्यात यावी, नुकसानीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क आणि प्रवेश शुल्क माफ व परत करण्यात यावे, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईवर बँकांचे होल्ड तात्काळ उठविण्यात यावे. आदी मागण्याचे निवेदन सोपविण्यात आले. या मोर्चाला स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजी महाराज, सरचिटणीस धनंजय जाधव, मोर्चाचे समन्वयक माधवराव देवसरकर, आणि पक्षाचे प्रमुख नेते सदा पाटील पुयड, अवधूत पाटील पवार, बालाजी पाटील कराळे, बालाजी धोंडे, पवन मोरे, अमोल वानखेडे, विष्वजीत पवार, देवा पाटील इंगळे, आकाश गोदले, शिवा पाटील शिंदे, बालाजी धोंडे यांची उपस्थिती होती.
या मोर्चाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांनी सरकारला आवाहन केले की, तातडीने त्यांच्या मागण्या मान्य करून शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा घडवावी. मोर्चादरम्यान शिस्तबद्ध वातावरणात, शांततेत शेतकऱ्यांनी आपल्या समस्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. युवराज छत्रपती संभाजी महाराज यांनी सरकारवर “शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. सरकारने तातडीने या समस्यांवर निर्णय घ्यावा अन्यथा आम्हाला अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल. स्वराज्य पक्षाच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली असून, सरकारकडून लवकरात लवकर ठोस निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.