उस्माननगर, माणिक भिसे l लोहा तालुक्यातील गोळेगाव (तपोवन) येथे शेतात काम करत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर विद्युत तार तुटून पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (दि.१८) रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे .


गोळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी सदाशिव धोंडीबा लादगे (वय ४६) हे आपल्या शेतातील टोमॅटो उद्या सकाळी बाजाराला भाजीपाला विक्रीसाठी नेण्याच्या उद्देशाने टोमॅटोची तोड करत होते . मात्र अचानक शेताच्या बाजूला असलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनीचा तार तुटून सदर सदाशिव लादगे या शेतकऱ्यांच्या अंगावर पडला. तारेचा आवाज ऐकून व शेजारच्या शेतकऱ्यांनी धावाधाव करत.

त्याला प्राथमिक उपचारासाठी नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर नांदेड विष्णुपूरी येथील शासकीय रुग्णालयात त्याचे शवच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दी.१९) रोजी सकाळी गोळेगाव येथे दहा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील , पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी असा परिवार आहे.


घरचा कर्ताच गेल्याने कुंटूबावर दु:खाचा डोंगर…
सदाशिव लादगे हे अल्पभूधारक शेतकरी असून आपल ्या मेहनतीने व कष्टाने भाजीपाला पिके सतत शेतात घेऊन संसार गाडा चालवत होते. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे लादगे परिवाराचा आधार वडच कोसळला असून या शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गाव परिसरात शोककळा पसरली आहे.


