हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर तालुक्यातील कोठा येथील शेतकरी अशोक विठ्ठल दवणे यांनी सोमवारी सायंकाळी आत्महत्या (Farmer commits suicide) केल्याची घटना घडली आहे.


गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. शेतातील उभे राहिलेले थोडेफार पीकसुद्धा पैनगंगा नदीत इसापूर धरणाचे दरवाजे उघडून सोडण्यात आलेल्या पाण्यात वाहून गेले. परिणामी दवणे यांच्या शेतात तळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.


या पाण्यात शेतीतील गाळ, पाईप, साहित्य वाहून गेले तर उभे पीक शंभर टक्के नुकसानग्रस्त झाले. झालेला खर्च कसा परत करायचा, सेवा सहकारी सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समजते.


गावचे पोलीस पाटील गौतम दवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोठा गाव नदीकाठावर असल्याने संपूर्ण शिवार पाण्याखाली गेले होते. या संकटातून मार्ग न दिसल्यानेच शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.



