किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळ परिसरातील वन जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागाने अनेक वेळा नोटीस बजावून देखील सहस्त्रकुंड येथील शेतकऱ्याने वन जमिनीवर अतिक्रमण करून सोयाबीनची पेरणी केल्याने इस्लापूर वन विभागाने पोलीस बंदोबस्तात वन जमिनीवरील अतिक्रमण निष्काशीत करून पोलीस बंदोबस्तातच इस्लापूर वन विभागाने त्या अतिक्रमण जमीनीवर वन महोत्सव अंतर्गत पोलीस बंदोबस्तातच वृक्षारोपणाची लागवड केली.
नांदेड किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा हा नांदेडच नव्हे तर महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन, अशा या प्रसिद्ध ठिकाणी असलेल्या वाळकी (बु) सर्वे नंबर 52 येथील वन जमिनीवर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते. त्यावेळेस देखील पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवल्याने त्यावेळी या ठिकाणी पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मात्र या शेतकऱ्यांनी पुन्हा यावर्षी वन जमिनी वरील जलचर नाल्या लेवल करून जमिनीवर अतिक्रमण करत जमीन शेती लायक बनवून सोयाबीन पेरले.
इस्लापूर वन विभागाने संबंधित अतिक्रमण शेतकऱ्यांना अनेक वेळा नोटीस बजावून देखील त्यांनी या नोटिसाला न जुमानता त्या अतिक्रमण वन जमिनीवर सोयाबीनची पेरणी केल्याने इस्लापूर येथील वन विभागाने हे अतिक्रमण हटवण्यासाठी आज दिनांक 05 जुलै 2024 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण हटवण्यासाठी अतिक्रमण वन जमिनीतील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवत आणि जेसीबीच्या सहाय्याने जलचर नाल्या काढत पोलीस बंदोबस्तातच त्या अतिक्रमण वन जमिनीवर वन महोत्सव अंतर्गत वृक्षारोपण लागवड करण्यात आली आहे.
सहस्त्रकुंड धबधबा पर्यटन स्थळातील जवळपास तीन ते चार एकर वन जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आले असुन सदर ही कारवाई नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक केशवजी वाबळे, सहाय्यक वन संरक्षक जी डी गिरी, यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे व वनपाल व्ही एस गुद्दे यांनी ही माहिती दिली आहे.
यावेळी इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले इस्लापूर येथील वनपाल वनरक्षक तसेच वनपरिक्षेत्र कार्यालय फिरत्या पथकाचे वनपाल, वनरक्षक, वनसेवक व पोलीस असे एकूण जवळपास 35 ते 40 कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यानंतर संबंधित अतिक्रमण धारकांनी परत वन जमिनीवर अतिक्रमण केल्यास त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसात तक्रार देण्यात येईल अशी वन विभागाने भूमिका घेत सदरील अतिक्रमणधारकांना समजावून सांगत चांगलीच तंबी दिली आहे.