कंधार, सचिन मोरे| कंधार नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा अंतिम दिवस राजकीय गजबजाट, कार्यकर्त्यांची धावपळ आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला होता. सुरुवातीला मंद गतीने सुरू झालेली अर्ज प्रक्रिया शेवटच्या दिवशी मात्र जोरदार वेगाने पुढे सरसावली. नगरपालिकेच्या दहा प्रभागातून नगरसेवक पदांच्या 20 जागेसाठी एकूण १२० अर्ज, तर नगराध्यक्षपदासाठी ८ अर्ज दाखल झाले असून कंधारमध्ये निवडणूक चुरशीची आणि अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.


पहाटेपासूनच पालिका कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. गाड्या, पक्षाच्या दस्त्या, घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या गजबजाटामुळे पालिका परिसर निवडणुकीच्या वातावरणाने थरारून गेला. अर्ज भरण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ सुरूच होती. सर्वाधिक अर्ज प्रभाग क्रमांक १ मध्ये १९ आणि प्रभाग १० मध्ये १८ दाखल झाले. तर प्रभाग ४ मध्ये फक्त ६ अर्ज दाखल झाल्याने येथे तुलनेने शांत लढत पाहायला मिळेल.


प्रभागनिहाय अर्जांची एकूण स्थिती पुढीलप्रमाणे : प्रभाग १ – 19, प्रभाग २ – 11, प्रभाग ३ – 11, प्रभाग ४ – 6, प्रभाग ५ – 10, प्रभाग ६ – 9, प्रभाग ७ – 14, प्रभाग ८ – 9, प्रभाग ९ – 13 आणि प्रभाग १० – 18. एकूण : १२० अर्ज


नगराध्यक्षपदासाठी आठ अर्ज दाखल झाले असून पक्षीय व अपक्ष अशा दोन्ही स्तरांवर उमेदवारांनी जोरदार तयारी दर्शवली आहे. भाजपकडून गंगाप्रसाद गोविंदराव यन्नावार, काँग्रेसकडून शहाजी अरविंदराव नळगे यांनी अर्ज दाखल केला आहे. अपक्ष म्हणून चेतन दौलत केंद्रे आणि कलीम हसन अन्सारी यांनी मैदानात उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुराधा चेतन केंद्रे, अब्दुल मन्नान म. सरवर, तर हणमंत विश्वनाथ लुंगारे यांनी एनसीपी आणि अपक्ष अशा दोन्ही मार्गाने दुहेरी अर्ज दाखल करून वेगळे राजकीय संकेत दिले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारीसाठी झालेल्या गर्दीमुळे कंधारच्या राजकारणात नवे गट, नवी समीकरणे आणि नवा राजकीय सूर उमटताना दिसत आहे. आता छाननी, माघारी आणि निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीनंतर कोणत्या चेहऱ्यावर नगराध्यक्षपदाची मुहर बसते, कोणत्या प्रभागात कोण विजयाची पताका फडकवतो, याची उत्सुकता कंधारकरांच्या मनात शिगेला पोहोचली आहे. कंधारची निवडणूक यंदा केवळ लढत नाही… तर नेतृत्व, विकास आणि भविष्याची दिशा ठरवणारा मोठा राजकीय शिलालेख ठरणार आहे.


