हिमायतनगर| तालुक्यातील मौजे एकंबा येथील कानिफनाथ महाराज देवस्थानच्या 60 एकर जागेवरील काही भागात अतिक्रमण झाले आहे. सदरचे अतिक्रमण हटवावे ( Ekamba Gram Panchayat passed a resolution to remove encroachment on the land of Kanifnath Temple) अशी मागणी एका निवेदनासह ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सरपंच, ग्रामस्थांनी हिमायतनगरच्या तहसीलदार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथे कानिफनाथ देवस्थानाची 60 एकर जमीन आहे. दरवर्षी फाल्गुन दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा (कानिफनाथ) महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने भरविण्यात येते. याबाबत जुने जाणकार सांगतात कि, कानिफनाथ महाराजाने आपल्या सातशे शिष्यांसह धर्मप्रचाराचे काम निजामी राजवटीत केलं होते. तेंव्हापासुन दरवर्षी कान्होबाची काठी भ्रमंतीला निघते. विदर्भातील वेगवेगळ्या गावात कान्होबाची काठी १० दिवस दर्शन देऊन एकंबा गावात परत आल्यानंतर मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढली जाते. त्यानिमित्त यात्रा भारावून मोठ्या आनंदात कान्होबाचा उत्सव साजरा केला जातो.


मागील १० वर्षाच्या काळात वारकरी संप्रदायातील महिला – पुरुष मंडळीनी येथील मंदिरासमोर दिली जाणारी बलिप्रथा बंद करण्यासाठी पुढाकार घेतला होता. आता या मंदिराच्या जागेत पुन्हा मोठे अतिक्रमण झाले असून, ते अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी गावकर्यांनी ग्राम पंचायतीचा ठराव घेऊन करण्यात आली आहे. मागील २० वर्षपूर्वी देखील येथील कानिफनाथ मंदिराच्या जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी प्रशासनाने यावर तोडगा काढून जमीन अतिक्रमण मुक्त केली होती. मात्र पुन्हा कानोबा देवाच्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे.


त्यामुळे शेतकरी सातबारावर असलेल्या जमिन प्रमाणे प्रत्यक्षात कमी दिसत आहे, त्यामुळे जमीन कसण्याचा लिलावात भाग घेण्यास कोणीही शेतकरी पुढे येत नाहीत. परिणामी देवस्थानच्या जमिनीचे नुकसान होत असून, ते अतिक्रमण हटवण्यात यावे असा ठराव घेण्यात आला होता. त्यास चार महिने लोटल्यानंतर देखील अतिक्रमण अद्याप काढले गेले नाही. किमान आतातरी तहसीलदार महोदयांनी या मुख्य व धार्मिक आस्थेच्या समस्येकडे जागरूक होऊन लक्ष द्यावे आणि तातडीने एकंबा येथील कानिफनाथ देवस्थानाची जमीन अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी पुढे येत आहे. त्यावर तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमण कायमस्वरूपी हटवून हद्द कायम करून देण्याचे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले आहे.



