मुंबई/नांदेड, अनिल मादसवार। नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील कोळी गावच्या बद्री चिंतामणी चव्हाण या ३५ वर्षीय पारधी समाजाच्या तरुणाचा मधमाशांच्या दंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १७ जून रोजी घडली. बद्री चव्हाण यांच्यावर त्यांच्या कुटुंबाच्या उपजीविकेची जबाबदारी होती व त्यांच्या मृत्यूने त्यांचे कुटुंब निराधार झाले होते.
सदर बाब शिवसेना नेते श्री बाबुराव कदम कोहळीकर यांना समजताच त्यांनी तातडीने मदतीसाठी त्यांची यंत्रणा कामास लावली. तसेच बाबराव कदम कोहळीकर यांनी महाराष्ट्र शासनाकडून पीडित कुटुंबास आर्थिक मदत मिळण्यासाठी, राज्याचे संवेदनशील व लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या समक्ष ही बाब ठेवताच, मुख्यमंत्री महोदयांनी या प्रकरणास तातडीने विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे वर्ग केली.
लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून शासनातर्फे पीडित कुटुंबास ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. लवकरच सदर आर्थिक मदत बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातर्फे पीडित कुटुंबास सुपूर्त करण्यात येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी पुन्हा एकदा त्यांची संवेदनशीलता त्यांच्या कार्यातून दाखवली व एका निराधार गरीब पारधी कुटुंबास मदत करून मुख्यमंत्री महोदय हे अनाथांचे नाथ आहेत हे पुन्हा एकदा सर्वांना अनुभवास आले.