हदगाव, गौतम वाठोरे| हदगांव हिमायतगर येथील महावितरणचे कर्मचारी आणि अधिकारी स्वतःला जनतेचे मालक समजून वागत असतील तर त्यांनी तो भ्रम काढून टाकावा. तुम्ही जनतेचे सेवक आहात, हे विसरू नका,अशा कडक शब्दांत हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हदगाव येथे शासकीय विश्रामगृहामध्ये शेतकऱ्यांच्या बैठकीमध्ये एमएसईबी (MSEB) प्रशासनाचे कान टोचले. बोरगाव येथील दुर्दैवी घटनेला अनेक दिवस उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खासदारांनी संताप व्यक्त केला.


बोरगाव घटनेवरून बैठकीत रणकंदन झाला


काही दिवसांपूर्वी बोरगाव येथे वीज वितरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे एक दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणाची दखल घेत खासदारांनी हदगाव-हिमायतनगर विभागातील महावितरण अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेतून प्रशासनाचा ढिम्म कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. घटनेला इतके दिवस होऊनही दोषींवर कारवाई का झाली नाही? आणि पीडितांना न्याय का मिळाला नाही? असा जाब आष्टीकर यांनी विचारला.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद दिली



बैठकीदरम्यान खासदार आष्टीकर यांनी अधिकाऱ्यांना सुनावले की:सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. हदगाव हिमायतनगर मध्ये कामात पारदर्शकता आणि तत्परता हवी. तात्काळ कामे मार्गी लाववले पाहिजे प्रलंबित असलेली सर्व दुरुस्तीची आणि नवीन जोडणीची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. जनतेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या आणि उर्मटपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.जनतेने आपल्याला निवडून दिले आहे ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी. जर महावितरणचे अधिकारी सर्वसामान्यांना वेठीस धरत असतील, तर आम्ही गप्प बसणार नाही. बोरगावच्या घटनेतील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.

वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या यांमुळे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील नागरिक त्रस्त आहेत. खासदारांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या सक्त सूचनांमुळे आता तरी महावितरणचा कारभार सुधारेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे







