Thursday, May 21

हदगाव तालुक्यातील रस्ते कामांवर माहिती फलक लावा – स्वाभिमानी शेतकरी संघटनाची मागणी

हदगाव (गौतम वाठोरे) तालुक्यात व शहरात सुरू असलेल्या रस्ते कामांवर अधिकृत माहिती फलक लावण्यात यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनाने केली आहे. या संदर्भात तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सध्या हदगाव तालुक्यात विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, कामाच्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार आवश्यक माहिती फलक लावण्यात आलेले नसल्याने पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

रस्ते कामे कोणत्या योजनेतून सुरू आहेत, अंदाजपत्रक किती आहे, कामाचा कालावधी किती आहे तसेच संबंधित कंत्राटदार कोण आहे, याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे. माहिती फलक नसल्यामुळे कामाच्या दर्जा आणि निधीच्या वापराबाबत जनतेमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासकीय कामांच्या ठिकाणी संपूर्ण माहिती देणारा फलक लावणे बंधनकारक असताना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी नांदेड तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठवण्यात आल्या आहेत. संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत :सर्व सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी तातडीने अधिकृत माहिती फलक लावावेत, कामांची सविस्तर माहिती सार्वजनिक करावी, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करून त्याची लेखी माहिती द्यावी, यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!