नांदेड| भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा यांच्या अंतर्गत महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी १९८८ साली स्थापन केलेल्या महाविहार बावरीनगर येथे शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून वैज्ञानिक दृष्टिकोन, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले जात आहे. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडून महाविहार बावरीनगरला तीर्थक्षेत्राचा (क) दर्जा प्राप्त झाला आहे.


या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून ध्यान केंद्र, बहुउद्देशीय सभागृह, भिक्खु व भिक्खूनी निवास, श्रामणेर-श्राविका निवास, भोजन कक्ष, अशोक स्तंभ, संरक्षण भिंत व अंतर्गत रस्ते अशा विविध कामांसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी बहुउद्देशीय सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, जगातील सर्वात उंच अशोक स्तंभाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रशासकीय इमारतीचे कामही वेगाने सुरू आहे.


या कामांचा आढावा घेण्यासाठी ११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा सुकाणू समितीची बैठक बावरीनगर (दाभड) येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून चालू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी अशोक स्तंभ, ध्यान केंद्र, प्रशासकीय इमारत यांच्या जागेची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी सर्व कामांचा आठवड्याभरात आढावा घेण्यात येईल असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, वास्तुविशारद आणि कंत्राटदारांना ‘परफॉर्मन्स ऑडिट’, रोड मॅप, बार चार्ट अशा आधुनिक प्रणाली वापरण्याचे आदेश दिले. व्हॉट्सअॅपसारख्या समाज माध्यमांचा वापर करून प्रगतीचा तात्काळ अहवाल देण्याची प्रणाली राबवण्यावरही भर दिला.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी कामांची गुणवत्ता आणि कालमर्यादेत पूर्णता यावर स्पष्टपणे लक्ष देण्याचे निर्देश दिले असून, बावरीनगर येथे कायमस्वरुपी पाणी पुरवठा यंत्रणा निर्माण करणे आणि महामार्गावरून येणाऱ्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी तहसीलदार अर्धापूर, गट विकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना संयुक्त प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस डॉ. एस. पी. गायकवाड, तहसीलदार देवणीकर, महावितरणचे पंकज देशमुख, पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कहाळे, सरपंच श्रीमती कांचन सूर्यवंशी, उपसरपंच अरविंद पांचाळ, डॉ. भत्ते खेम्म धम्म, डॉ. भत्ते सत्यपाल, डॉ. मिलींद भालेराव, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.