नांदेड| जिल्ह्यातील हदगाव येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात लाच मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेशन वितरणाशी संबंधित प्रलंबित कामासाठी ७५०० रुपयांची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार सुमन कऱ्हाळे व कंत्राटी संगणक ऑपरेटर गोविंद जाधव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेडच्या पथकाने रंगेहात पकडले. या प्रकरणी हदगाव पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तक्रारदाराचे नावावर रेशन दुकान असून मागील चार महिन्यांतील ५७ हजार रुपये कमिशन, नोव्हेंबर २०२५ मधील ई-पॉस मशीनवरील पुरवठा अपलोड, तसेच २७ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी ही कामे जाणीवपूर्वक रखडवून ठेवण्यात आली होती. ही कामे करण्यासाठी शासनाकडून मिळालेल्या कमिशनपैकी २० टक्के रक्कम लाच म्हणून मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला.


कऱ्हाळे यांच्या उपस्थितीत कंत्राटी ऑपरेटर गोविंद जाधव यांनीही त्याच लाचेची मागणी केली होती. तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० नोव्हेंबर २०२५ रोजी पडताळणी व सापळा रचला. तडजोडीअंती निश्चित केलेली ७५०० रुपयांची लाच जाधव यांनी स्वीकारताच पथकाने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. पंचासमोर जाधव यांनी घेतलेली रक्कम स्वतःसह नायब तहसीलदार कऱ्हाळे यांच्यासाठी असल्याचे स्पष्ट केले.


ताब्यात घेतलेल्या कऱ्हाळे यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे, तर जाधव यांना वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, हेडकॉन्स्टेबल अरशत अहमद खान, गजानन राऊत व सय्यद खदिर यांनी प्रभावीपणे सहभाग नोंदवला.



