नागपूर| विदर्भ–खान्देश–कोकण प्रांतातील नागरिकांसाठी फळ, फुल व शेतीमालाच्या वाहतुकीस प्राधान्य देण्यासाठी मध्य रेल्वेच्या गणेशोत्सव विशेष रेल्वेगाडी क्र. 01139/40 नागपूर–मडगांवसाठी तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी सेवा व चांदुर, मूर्तीजापूर, नांदुरा, बोडवड, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, पेण येथे अतिरिक्त थांबे सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.


ही मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण–सावंतवाडी (रजि.) च्या विदर्भ–खान्देश संपर्क प्रमुख वैभव बहुतूले यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री, पंतप्रधान, रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

त्यांनी पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे की, विशेष रेल्वेसेवा सुरु झाल्यास नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, नांदुरा, नाशिक, कोकण प्रांतातील धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांना सोप्या प्रवासाची सोय होईल. तसेच फल, फुल व शेतीमालाची वाहतूक सुकर होऊन उद्योग व बाजाराला चालना मिळेल, बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होतील, आणि मध्य रेल्वे प्रशासनाला राजस्व लाभ मिळेल.


यामुळे नागपूर–बल्हारशाह–मडगांव मार्गावर रेल्वेसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, तसेच कोकण–खान्देश–विदर्भ भागातील नागरिकांना प्रवास व व्यापारासाठी मोठा लाभ मिळेल.


