हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मौजे कामारी येथे ठिकठिकाणी विजेच्या तारांचे जाळे खाली लोंबकळत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना थेट डोक्याला लागतील इतक्या खालपर्यंत तारा आल्या असून, ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. तात्काळ मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या २५ सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक पाटील यांनी दिला आहे.


गेल्या ३० ते ४० वर्षांपासून वाकलेले विद्युत खांब, जिर्णावस्थेत असलेल्या तारांमुळे वारंवार विज खंडित होणे व ट्रान्सफॉर्मरमध्ये होणारे बिघाड यामुळे गावातील विद्युत उपकरणेही वारंवार खराब होत आहेत. प्रशासन व महावितरण यांना वारंवार विनंती करूनही याची दखल घेतली जात नसल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.


हि बाब लक्षात घेऊन गावातील उपसरपंच अशोक पाटील शिरफुले कामारीकर यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “२५ सप्टेंबर २०२५ पर्यंत जर गावातील विद्युत उपकरणांचे नूतनीकरण व दुरुस्तीची कामे केली नाही. तर मी आमरण उपोषणास बसणार आहे. या सर्व समस्यांमुळे जर काही अपघात किंवा जीवितहानी झाली तर त्यास महावितरण जबाबदार असेल. असेही देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे. किमान आता तरी महावितरण कंपनीने ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी दखल घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.



