नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापाठीच्या ज्ञान स्त्रोत केंद्र इमारतीमध्ये लोकसभा पोटनिवडणूक व सहा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणी लोकसभेसाठी 6 व विधानसभेसाठी 6 अशा 12 मतमोजणी केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच स्ट्राँग रूमची निर्मिती करण्यात आली आहे. लोहा, हदगाव, किनवट या तीन विधानसभा क्षेत्राची मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक एकाच वेळेस येत असल्यामुळे यावेळी जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी देखील नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात होणार आहे. अन्यवेळी नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर अशीच विधानसभेची मतमोजणी शहरात होत होती. मात्र यावेळी दोन्ही निवडणुका सोबत असल्यामुळे भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर, मुखेड या लोकसभा क्षेत्रातील विधानसभेची मतमोजणी देखील विद्यापिठामध्ये होणार आहे. यासाठी 12 स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकसभेतील 6 मतदारसंघातील मतपेट्या तसेच 6 विधानसभा क्षेत्रातील मतपेट्या ठेवण्यात येणार आहेत.
20 नोव्हेंबरला मतदान व 23 नोव्हेंबरला मतमोजणी असल्यामुळे केवळ 20 रोजीच्या रात्री पर्यंत पोलिंग पार्टी नांदेडला पोहचतील. 21 व 22 रोजी मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये असेल. 23 नोव्हेंबरच्या पहाटे निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार स्ट्राँग रूममधून मतपेटीतून उमेदवारांच्या उपस्थितीत ईव्हिएम बाहेर काढल्या जातील. त्यानंतर मतमोजणी होईल. त्यामुळे विद्यापिठाच्या उपलब्ध पायाभूत सुविधांमध्ये काही अंशिक बदल करण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामकृष्ण गलधर, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पुसदकर, तहसिलदार संजय वारकड, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, सहायक अभियंता सावन कासलीवाल आदी अधिकारी यासंदर्भात कार्यरत आहेत. आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्यासह ललीतकुमार वऱ्हाडे, डॉ सचिन खल्लाळ आदींनी या केंद्रांची पाहणी केली.
जिल्ह्यातील लोहा, हदगाव, किनवट या मतदारसंघातील मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. लोहा विधानसभेसाठी महसूल हॉल तहसिल कार्यालय लोहा येथे तर हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण भवन येथे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय वसतिगृह तामसा रोड हदगाव येथे होणार आहे. किनवट विधानसभेसाठी येथील आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे.