नांदेड| २१ जून हा जागतिक योगा दिन आहे. यानिमित्त भारतातून उगम पावलेल्या योगाचे जगभरात सादरीकरण होत असते. फक्त योगा दिनानिमित्त योगा करून आरोग्यामध्ये काही फरक पडणार नाही तर त्यासाठी नियमितपणे योगा करणे आवश्यक आहे. तरच निरोगी आयुष्य जगता येईल. म्हणून योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य होय. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले.
ते आज दि. २१ जून रोजी जागतिक योगा दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या इनडोअर हॉलमध्ये आयोजित शिबिरास मार्गदर्शन प्रसंगी मत मांडत होते. याप्रसंगी महाराष्ट्रीय मंडळ सीएसीपीई चे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे योग प्रशिक्षक डॉ. पल्लवी कव्हाने या उपस्थितांना योगाचे धडे देत होत्या. योगा दिनाच्या पूर्वसंध्येस डॉ. पल्लवी यांचे ‘अथ योगानुशासनम: जीवन जगण्याची कला’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी डॉ. पल्लवी म्हणाल्या मानवी जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचे जर काही असेल तर शरीरात असणारा श्वास हा होय. श्वास आहे तर जीवन आहे, श्वास संपला जीवन संपले.
आपण नुसते श्वासाकडे नियमित लक्ष दिले तरीही ८० टक्के रोगापासून आपण मुक्त होऊ शकतो. एका मिनिटात आपण किती वेळा श्वास घेतो आणि तो कालावधी कमीत कमी कसा करता येईल यावर लक्ष देता आले पाहिजे, म्हणजेच आपण जर एका मिनिटात वीस वेळा श्वास आत घेऊन बाहेर टाकत असेल तर त्या गतीला कमी करता आले पाहिजे. विस वरून सतरा, सोहळा, पंधरा, दहा असे करत करत एका मिनिटात फक्त दोन वेळा श्वास घेता आला पाहिजे. म्हणजे आपण दीर्घायुष्य जीवन जगू शकतो. हे अशक्य नाही कारण योग साधनेला बसलेल्या आपल्या ऋषीमुनींनी ते शक्य करून दाखविले आहे. आणि ते दीर्घायुष्य जगले आहेत.
याप्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, व्यवस्थापन परिषद सदस्य इंजिनीयर नारायण चौधरी, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. डी. एम. खंदारे, दूरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनायक जाधव, प्रा. डॉ. डी.डी. पवार, प्रा. डॉ. नितीन दारकुंडे, प्रा. डॉ. भिमा केंगले, प्रा. डॉ. निना गोगटे, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. मनोज रेड्डी, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव हुशारसिंग साबळे, मेघश्याम सोळंके, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुस्सेकर, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यन्नावार, रामदास पेदेवाड, अधिसभा सदस्य शिवाजी चांदणे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.