नवीन नांदेड | मार्कड येथील गावविकासासह प्राचीन आणि ऐतिहासिक हेमांडपंथी मार्कडेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत कटिबद्ध असल्याचे आश्वासन नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी दिले.


मार्कड येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तसेच पुनर्वसन योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा दि. २३ जानेवारी रोजी पार पडला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एक कोटी आठ लाख रुपये निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या प्रसंगी आमदार बोंढारकर यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, “गावाच्या मूलभूत सुविधांचा विकास करतानाच सांस्कृतिक व धार्मिक वारशाचे जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. मार्कड येथील प्राचीन हेमांडपंथी मार्कडेश्वर मंदिराचा विकास करून त्याला योग्य प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील.”


या कार्यक्रमास बालाजी पाटील पुणेगावकर, बाळू पाटील ब्रह्माणवाडेकर, उद्धव पाटील शिंदे, सुहास खराणे, दिगंबर येवले (माजी सरपंच), अशोक मोरे, बाबुराव बोकारे, नामदेव बोडके, नामदेव लामदाडे, आनंदा कोकडवार, संतराम येवले, बालाजी लामदाडे, प्रकाश सावंत, गोपाळ धुतराज, रंगनाथ लामदाडे, सरपंच प्रतिनिधी बालाजी शिंदे, उपसरपंच आकाश येवले, ग्रामसेवक टी. एम. शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या विकास कामांमुळे मार्कड गावाच्या पायाभूत सुविधांना चालना मिळणार असून धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही गावाचा विकास होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.


