हिमायतनगर, अनिल मादसवार| गेल्या दोन दिवसापासून सकाळी पडलेल्या भयंकर धुक्याच्या साम्राज्याने वाहनधारक, पदाचार्यासह शेतकरी नागरिक हैराण झाले. दि.२३ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत सुरु असलेल्या धुक्यामुळे पुन्हा एकदा शेतकर्यांना पिकाची चिंता लागली असून, प्रामुख्याने कापूस, तूर व फळबागांना धोका होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात..! जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तात्काळ शासनाने शेतकऱ्याना सरसकट मदत दिवाळीपूर्वी द्यावी अशी म्हणी देखील होऊ लागली आहे.
एकीकडे राज्यात नैसर्गिक आपत्ती, गारपीट, वादळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळात तडाखा, यामुळे शेतकरी व प्रशासन त्रस्त आहे. त्यातच परतीच्या पावसाने दिलेली जोरदार हजेरी यामुळेच कि काय..? आता दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सह बहुतांश तालुका परिसर सकाळच्या वेळी धुक्याने व्यापला गेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसा गरम, रात्रीला थंड, सकाळच्या प्रहरी धुक्याचे साम्राज्य यामुळे आबाल वृद्ध घरातून बाहेर पडण्यास धजावत नाहीत. आजवरच्या काळात कधीच पडले नाही एवढे धुके दि.23 रोजी पडले असून, अक्षरश्या १०० फुट दूरवरील व्यक्ती अथवा परिसर दिसत नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे.
सकाळी ४ वाजता बाहेर पडणारे नागरिक चक्क ६ नंतर घराबाहेर पडले असले तरी वाहन चालविताना धीम्या गतीने व लाईट लावून चालविण्याची वेळ आली होती. पादचारी तर विचार करून पावुले टाकत रस्ता पार करीत होते, शेतकरी सुद्धा नेहमीपेक्षा तासभर उशिरा म्हणजे सकाळी ६.३० वाजता शेतीकामासाठी बाहेर पडल्याचे दिसून आले आहे. हिमायतनगर स्थानकावर रेल्वे देखील धुक्यामुळे उशिरा दाखल होऊन पुढे रवाना झाली.
सकाळी 7 वाजता डोक्यावर येणारा सुर्य माथ्यावर आला असताना देखील धुक्याच्या वातावरणामुळे दडून बसल्याचे दिसून आले आहे. काही दिवस हीच स्थिती राहिली तर ओल्या धुक्यातून व्हायरल इन्फेक्षण होऊन अनेकांना विविध आजाराला बळी पडावे लागणार आहे. तर बहरात आलेल्या कापसाची चाफी गळती होऊन पिकांवर लाल्या आणि मावा रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बहरात आलेल्या तुरीचे फुल करपून जाऊन या पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच ऊत्पादनात घट निर्माण झाल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या धुक्याच्या साम्राज्याने आणखी चिंतेत टाकले आहे.
दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीचा मोबदला द्यावा
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अतिवृष्टीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हाती आलेले सोयाबीन पूर्णतः गेल्यात जमा आहे. उर्वरित सोयाबीनच्या काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने निसर्गाच्या कोपामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. चार दिवसावर दिवाळी येऊन ठेवपळी असताना अतिवृष्टीच्या नुकसानीचा मोबदला मिळाला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात..! जाणार असल्याची भीती आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हि परिस्थिती लक्षात घेता शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसानीचा मोबदला देणार असल्याचे जाहीर केले. त्या प्रमाणे दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीचा मोबदला द्यावा अशी मागणी केली जात आहे.