नांदेड l राज्य शासनाच्या वर्ग-३ व वर्ग-४ पदांवर कार्यरत स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना महायुतीने मोठा दिलासा दिला असून, त्यांची सेवासमाप्ती होणार नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेला पाठपुरावा फलदायी ठरला आहे.
एका न्यायालयीन आदेशामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकऱ्या संकटात आल्या होत्या. यातील काही लोकांनी तब्बल २५-३० वर्ष सेवा दिलेली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती अन्यायकारक असल्याची बाब त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली. यातील काही जणांनी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याविषयी राज्य सरकारकडून न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता खा. चव्हाण यांनी तातडीने विविध पातळ्यांवर राज्य सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु केले. हे प्रकरण जुने आहे व त्यातील अनेकांची प्रदीर्घ सेवा झाली आहे. शिवाय हे कर्मचारी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्याने त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, राज्य सरकारने सदर कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात येणार नाहीत हे स्पष्ट केले आहे. हा प्रश्न उद्भवल्यानंतर अवघ्या तीन आठवड्यात महायुती सरकारने घेतलेला अनुकूल निर्णय व त्यासाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल सदर कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.