किनवट/नांदेड| किनवट तालुक्यातील शिवनी परिसरात रविवारी सकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे कंचलीच्या नाल्याला अचानक पूर आला. या पुराच्या प्रवाहात म्हैसा येथील व्यापारी वाहून जाण्याची धक्कादायक घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून व्यापाऱ्याने झाडाच्या फांदीला धरून जीव वाचवीला तात्काळ परिसरातील नागरिकांनी दोर टाकून पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यापाऱ्यांस वाचविले.


मिळालेल्या माहितीनुसार, सदरील म्हैसा येथील व्यापारी सकाळी व्यवसायासाठी शिवनी येथे आला होता. काम आटोपून परत जात असताना साडेदहाच्या सुमारास कंचलीच्या पुलावरून जाताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने त्याला वाहून नेले. मात्र, दैव बलवंत ठरले आणि त्या व्यापाऱ्याने एका झाडाच्या फांदीला धरून कसाबसा आपला जीव वाचवला. गावकऱ्यांना याची माहिती होताच त्यांनी तातडीने धाव घेऊन व्यापाऱ्याला दोरीच्या साहाय्याने पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.



उल्लेखनीय म्हणजे, या पुलावर यापूर्वीही शाळकरी विद्यार्थी व शेतकरी पूराच्या पाण्यात अडकले होते. त्या वेळीही गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना सुखरूप वाचवण्यात आले होते. या पुलाची उंची कमी असल्याने दरवर्षी अशा घटना घडत असून, पुलाची उंची वाढवावी अशी गावकऱ्यांची सातत्याने मागणी आहे. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आजही जीव धोक्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.



