नांदेड| नांदेड शहरात आगमन झाल्याबरोबर शहर अस्वच्छतेचे दर्शन घडते. त्याला जबाबदार संबंधीत यंत्रणेबरोबरच सामान्य जनता आहे. परंतु स्वच्छ सुंदर नांदेडसाठी मनपासारख्या यंत्रणेला सरकारचे पाठबळ असते. तरीही शहरातील शहर बसस्थानकाचा परिसर दुर्लक्षित असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या संदर्भात नांदेड जिल्हा पर्यटन विकास समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.
मध्यवर्ती बसस्थानक ते देगलूर नाका हा रस्ता अधिकारी, मंत्र्यांनी स्पॉट पाहणी करुन त्याचे काय करायचे हे ठरवावे असेही या निवेदनात नमूद करण्यात आले. या मार्गावर २.३ फुट खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे पक्का रस्ता करुन कायमचे बुजवावेत यासाठी अनेकवेळा संबंधीत यंत्रणेचे लक्ष वेधूनही संबंधीतांनी दुर्लक्ष केले ही बाब शहर विकास, सौंदर्याच्या कामात जाणीवपूर्वक अडथळे आणणारी असल्याची तिखट प्रतिक्रियाही समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आली. एक कदम स्वच्छता की ओर ही टॅग लाइन सर्व नागरिकांना स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आपापल्या परीने योगदान देण्यासाठी प्रेरित करते.
या पंधरवड्यात नागरिक,स्वयंसेवी संस्था, जिल्हा प्रशासन, मनपा, सार्वजनिक बांधकाम विभाग रेल्वे, एसटी महामंडळ आणि स्वच्छता विभागाने संयुक्त नियोजन करुन पर्यटन विकास दृष्टीकोनातून नांदेड रेल्वे स्थानक परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, शहर बसस्थानक परिसराची जायमोक्यावर जावून पहाणी करावी.या परिसरात असलेले घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता दूर करणे, विद्रुपीकरण थांबविणे व शहर प्रवेश सुंदर करता येईल याची सुरुवात करावी असेही समितीने निवेदनात म्हटले आहे.हे निवेदन देताना नांदेड जिल्हा पर्यटन विकास समितीचे दत्तात्रय कुलकर्णी, ॲड.सुदेश पईतवार, ॲड.विजयेंद्रसिंघ रागी, कृष्णा उमरीकर उपस्थित होते.