नांदेड | नांदेड महानगरपालिकेवर भाजपाचाच महापौर बसावा, या ठाम निर्धाराने भाजपाने निवडणूक रणनितीला वेग दिला असून, भाजपा जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी प्रचार कार्यालय सुरू झाल्यापासून ते निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत अक्षरशः आपला बाडबिस्तारा सोबत घेऊन मध्यवर्ती निवडणूक प्रचार कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे. त्यांच्या या अहोरात्र सुरू असलेल्या कार्याची दखल घेत भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.


ॲड. दिलीप ठाकूर हे केवळ पदाधिकारी नसून, निवडणूक विजयाचे अनुभवी शिल्पकार म्हणून ओळखले जातात. सन १९९५ पासून आतापर्यंत झालेल्या तब्बल नऊ लोकसभा व आठ विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पूर्णवेळ झोकून देत प्रचार यंत्रणा उभी केली आहे. निवडणूक व्यवस्थापनातील अचूक रणनीती, काटेकोर नियोजन आणि दूरदृष्टीमुळे त्यांची ओळख ‘इलेक्शनचे मास्टरमाईंड’ म्हणून प्रस्थापित झाली आहे.

याच प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर यावेळच्या महानगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण, खासदार अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कोडगे, अमर राजुरकर व माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी भाजपाच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाची संपूर्ण जबाबदारी दिलीप ठाकूर यांच्यावर सोपवली आहे.


आयटीआय भागात उभारण्यात आलेले अत्याधुनिक मध्यवर्ती प्रचार कार्यालय हे भाजपाच्या निवडणूक लढ्याचे खऱ्या अर्थाने ‘वॉर रूम’ ठरत आहे. येथे दररोज रणनिती बैठका, पत्रकार परिषद, उमेदवारांशी थेट संवाद, नेत्यांचे दौरे, सभा व रॅलींचे नियोजन, वाहन व कार्यक्रम परवानग्या, निवडणूक खर्चाचा तपशील तसेच वृत्तपत्र व माध्यमांचे विश्लेषण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने केले जात आहे. या कार्यालयामार्फत नांदेड शहरातील सर्व उमेदवारांशी दररोज समन्वय ठेवून प्रचाराला एकसंध व आक्रमक दिशा दिली जात आहे.

ॲड. दिलीप ठाकूर यांच्या शिस्तबद्ध, नियोजनबद्ध व अहोरात्र सुरू असलेल्या कार्याची दखल घेत प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते झालेल्या सत्कारामुळे त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सत्कारामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भाजपाचा विजय आता केवळ शक्यता न राहता निश्चित दिशेने वाटचाल करत असल्याचा ठाम राजकीय संदेश नांदेडकरांपर्यंत पोहोचत आहे.

