बिलोली, गोविंद मुंडकर| तालुक्यातील कासराळी येथील एक महिला आपल्या घराच्या अंगणात कपडे वाळवीत असताना गावातीलच एका आरोपीने फिर्यादी महिलेचा वाईट हेतुने हात धरून तीचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बिलोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय घोरपडे यांनी आरोपीस दोन वर्ष सक्त मजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बिलोली तालुक्यातील कासराळी येथील एक महिला दि. १४ मार्च २०२३ रोजी कासराळी येथील आपल्या घरातील अंगणात कपडे वाळवीत होती. त्याच वेळी गावातील शिवानंद शंकरराव स्वामी हा फिर्यादी महिलेच्या जवळ जाऊन वाईट हेतूने फिर्यादी च्या हातास धरून तु लई माजलीस तुला उचलून नेतो असे म्हणत हातास ओढून तुला बघून घेतो असे म्हणत वाईट हेतुने हात धरून फिर्यादी महिलेचा विनयभंग केला होता.


या प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून बिलोली पोलीस स्थानकात आरोपी विरूध्द कलम ३५४,३५४(ड), ३२३,५०४,५०६ भा. द. वी नुसार बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा पि. एस. आय एस. एस रायपल्ले यांनी तपास करून बिलोली न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारतर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आल्या.

साक्ष पुरावे व सरकारी अभियोक्ता यांनी मांडलेला युक्तीवाद ग्राह्य धरून बिलोली येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्या. व्ही आय घोरपडे यांनी आरोपी शिवानंद स्वामी यास दि. २५ मार्च २०२५ रोजी आर. सी. सी ५९/२३ कलम ३५४ अंतर्गत २ वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.सदर प्रकरणी सरकारतर्फे सरकारी अभिवक्ता ॲड. एम. के मांडे यांनी बाजु मांडली तर पैरवी अधिकारी म्हणून बी. एस कोळणुरे यांनी काम पाहिले.
