देगलूर/नांदेड| बाल वया पासून ते जिवनाच्या अंतिम श्वासापर्यंत वडीलांच्या आधाराची मानसाला नितांत आवश्यकता असते. कधी कधी भरकटलेल्या तरूण पिढीकडून आई वडीलांकडे दुर्लक्ष होत असते. अशा भरकटलेल्या पिढीला दिशा देण्यासाठी बाबा तुमच्यासाठी..! अशा उपक्रमांची नितांत आवश्यकता आहे. अशा उपक्रमामुळे समाजाला प्रेरणा मिळते. असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी केले. ते देगलुर तालुक्यातील होट्टल येथे आयोजित *बाबा तुमच्यासाठी..!* या उपक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलत होते.
जेष्ठ पञकार गोविंद मुंडकर यांच्या संकल्पनेतुन गत काही वर्षापासून बाबा तुमच्यासाठी..! हा उपक्रम राबविण्यात येतो.या उपक्रमाअंतर्गत तरूण पिढीला वडीलांच्या त्यागाची,त्यांच्या कष्टाची व उतार वयात होणाऱ्या अडचणींची जाणीव करून देण्याच्या प्रयत्नांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यंदा ४ जुलै रोजी धर्माबाद तालुक्यातील संगम येथे वृक्ष लागवड करून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानंतर धर्माबाद व बिलोली तालुक्यातील गावांमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
दि.२० जुलै रोजी होट्टल येथील परमेश्वर मंदिराच्या परिसरात बाबा तुमच्यासाठी..! या उपक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन गिरी, उप विभागीय पोलिस अधिकारी संकेत गोस्वामी,जिल्हा युवा अधिकारी चंदा रावळकर, नागपुरचे प्रसिध्द उद्योगपती अनिल गोनाडे, आलिषा नागपुरकर,सेवा निवृत शिक्षक शामराव इनामदार, श्रीमती भागरथबाई मुंडकर , तात्या देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बाबा तुमच्यासाठी..! या उपक्रमाअंतर्गत होट्टल येथील कार्यक्रमात देश सेवा करून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक शंकरराव मुंडकर, शंकरराव बोंगाळे यांचा व प्रसिद्ध कलावंत सलिमभाई कव्वाल, वेंकट शिरगिरे, भालेराव यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार, सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते परमेश्वर मंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी सलिम कव्वाल यांनी सादर केलेल्या धार्मिक व देशभक्तीपर गितांनी कार्याक्रमाची शोभा वाढवली.सदर कार्यक्रमास बिलोली,नायगाव,धर्माबाद तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिकांसह होट्टल येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.