नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या आस्थापनेत नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या ६२ पात्र अनुकंपाधारकांना सेवेत रुजू करून घेण्याच्या निर्णयावरअखेर मोहर लागली आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज याबाबतचे आदेश जारी केले.
नांदेड जिल्हा परिषदेत नियुक्तीसाठी प्रतीक्षेत असलेले अनुकंपाधारक मागील काही महिन्यांपासून आंदोलन व निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत होते. दरम्यान त्यांनी गेल्या महिन्यात खा. अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन आपल्याला अद्याप नियुक्ती मिळाली नसल्याची व्यथा मांडली. त्यानंतर खा. चव्हाण यांनी तातडीने राज्याचे ग्रामविकास मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून हा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. त्यानुसार महायुती सरकारने वेगाने कार्यवाही करून नांदेड जिल्हा परिषदेतील ६२ अनुकंपाधारकांना नियुक्त्या देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ६२ अनुकंपाधारकांना ज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेच्या आधारे नियुक्ती देण्यात आली आहे. आज नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांमध्ये २ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), १ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ३ आरोग्य सेवक, १ पशुधन पर्यवेक्षक, ६ कंत्राटी ग्रामसेवक आणि ४९ परिचरांचा समावेश आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणारे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे नियुक्ती मिळालेल्या अनुकंपाधारकांनी आभार मानले आहेत.