नांदेड। अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी आगामी लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अनुषंगाने नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यावरून आज एका गुन्हेगारास MPDA अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे.
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सुध्दा त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदांराकडुन गुन्हेगांराना स्थानबध्द करण्यासंबंधाने MPDA प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे. MPDA अंतर्गत 23 आरोपीतांना कारागृहामध्ये ” स्थानबध्द ” करण्यात आले आहे. तसेच लोकसभा पोट निवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पार्श्वभुमीवर गुन्हेगारांची यादी तयार करुन, त्यांना स्थानबध्द करण्याची प्रकीया चालु करण्यात आली आहे.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण यांचेकडुन सराईत गुन्हेगार नामे अजय भगवान जोगदंड, वय 22 वर्ष, व्यवसाय बेकार राहाणार ND-41, K-2, राहुलनगर, सिडको नांदेड ता. जि. नांदेड या आरोपी विरुध्द खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशिर घातक शस्त्र वापरणे अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे व दखलपात्र गुन्हे दाखल असल्याने त्याचे विरुध्द एम. पी. डी. ए. अधिनियमाप्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे सादर करण्यात आला होता. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर MPDA प्रस्तावमधील आरोपीस एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती.
अभिजित राऊत, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील गुन्हेगार हे धोकादायक व्यक्ती सिध्द झाल्याने आरोपी नामे अजय भगवान जोगदंड, वय 22 वर्ष, व्यवसाय बेकार राहाणार ND-41, K-2, राहुलनगर, सिडको नांदेड ता. जि. नांदेड यास एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे MPDA कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे आदेश पारीत केले आहेत. यापूर्वी नांदेड जिल्हयातील 22 गुन्हेगांराना MPDA कायद्या अंतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबध्द केले होते, आता ती संख्या 23 झाली आहे.