हिमायतनगर। भारतीय स्टेट बैंकेत मायक्रो फायनान्स कंपनीची जमा झालेल्या वसुलीची रक्कम भरण्यासाठी गेले असता लाईनमध्ये उभे असलेल्या पाठीमागील कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने बैगेची चैन काढून वरील 41 हजार 460 रूपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वारंवार बैंकेतून अशी रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आकाश भगवान जोगदंड वय 24 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी रा. गोडवडसा ता. माहूर जि. नांदेड हा. मु. रेल्वेस्टेशन रोड हिमायतनगर हे नेहमीप्रमाणे B.S.S. MICROFINANCE कंपनीचे वसूल झालेली 4 लक्ष 61 हजार 460 रूपयांची रक्कम भरण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत गेले होते. बुधवार आठवडी बाजार असल्याने आणि खरीप हंगाम असल्याने बैंकेत गर्दी होत आहे. त्यातच दि. 03/07/2024 रोजी दुपारी 14:50 वाजता जोगदंड रक्कम डिपॉझिट करण्यासाठी लाईनमध्ये उभे होते.
दरम्यान यावेळी त्यांच्या पाठीमागील बँगेमधुन 41 हजार 460 रू नजर चुकवून गर्दीचा फायदा घेवून कोणीतरी अज्ञात चोरट्याने अलगदपणे काढून चोरून नेले आहे. हा प्रकार रक्कम काउंटरवर गेले असता त्यातील रक्कम गायब झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हा प्रकार भारतीय स्टेट बैंकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, जोगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक 146/2024 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता 2023 कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या घटनेचा पूढील तपास पोलीस निरीक्षक शरद जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकोन्स्टेबल नागरगोजे हे करत आहेत.
गतवर्षी देखील याच बैंकेतून एका व्यापाऱ्यांची आणि एका शिक्षकाची मोठी रक्कम चोरीला गेली होती, त्या घटनेचा तपास जैसे थेच आहे, सीसीटीव्ही कैमेऱ्यात आरोपी दिसत असताना चोरट्याचा शोध पोलिसांना लावता आला नाही, त्यामुळे बैंकेत रक्कम काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे.