आज सकाळीच आम्हाला कटरा साठी निघायचे होते. पण यात्रेकरूमध्ये आपसात कुजबुज चालू होती की, श्रीनगरला येऊन शंकराचार्य मंदिर चे दर्शन घेणे आवश्यक आहे. दोघा तिघांनी मला सांगितले की, भाऊ कसेही करून शंकराचार्याचे आम्हाला दर्शन घेऊन द्या. प्रॉब्लेम असा होता की, शंकराचार्य मंदिर सकाळी साडेसातला उघडत होते.नो एन्ट्री सुरू होण्यापूर्वी डल लेक वरून कोणत्याही परिस्थितीत मोठ्या बसेस काढणे आवश्यक होते. यावर मी असा तोडगा काढला की, ज्यांना शंकराचार्य चे मंदिर पाहायचे आहे त्यांनी आपले सामान आपल्या मोठ्या बस मध्ये ठेवावे आणि दुसऱ्या कोणत्याही वाहनाने शंकराचार्य मंदिर पाहून बायपास वर उभ्या असलेल्या आपल्या बसमध्ये यावे. त्यावर सगळ्यांनी सांगितलं की, तुम्हीच काहीतरी वाहनाची व्यवस्था करून द्या. आता इतक्या सकाळी सगळ्यांसाठी वाहने मिळणे थोडे अवघड होते.
मी सज्जादभाईला फोन लावला आणि सांगितले की, सहा टाटा सुमो कसेही करून पाठवून द्या.त्यांनी उत्तर दिले की, कालच कल्पना दिली असती तर ही व्यवस्था होऊ शकली असती, तरी देखील प्रयत्न करतो. थोड्या वेळाने टाटा सुमोची व्यवस्था झाल्याचे समजले.मी लगेच ग्रुप वर टाकले की, ज्यांना जायचे असेल त्यांनी आपली नावे यादीत समाविष्ट करावी. बघता बघता पन्नास पेक्षा जास्त जण शंकराचार्यासाठी तयार झाले. त्या सर्वांचे सामान मोठ्या बसमध्ये ठेवून आमच्या बसेस पंथा चौक बायपास वर थांबल्या.आदी शंकराचार्य यांनी बांधलेले महादेवाचे मंदिर अतिशय पुरातन आहे. उंच टेकडीवर असलेल्या मंदिरासाठी शंभर पायऱ्या चढाव्या लागतात. अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्यामुळे या मंदिराला कडक सुरक्षा देण्यात आलेली आहे.शंकराचार्य मंदिरातून निघालेली छडी मुबारक पदयात्रा राखी पौर्णिमेला पवित्र गुफेत पोहोचल्यानंतरच अमरनाथ यात्रेचा समारोप होतो. श्रीनगर शहराचे अतिशय विहंगम दृश्य सर्वांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले.आमच्या सोबत असणाऱ्या बालाजी जाधव यांना तातडीचे काम निघाल्यामुळे विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करून त्यांना निरोप दिला.
१० वाजता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. श्रीनगर ते कटरा हे अंतर २२२ किलोमीटरचे आहे.रस्त्यात केशरची शेती होत असलेल्या पंपोर या गावी शासनाने अधिकृत केलेल्या दुकानातून सर्वांनी केशर, ड्राय फ्रुट्स, शिलाजीत, ची खरेदी केली.हलमुल्लाह या गावात क्रिकेट बॅट बनवण्याचे अनेक कारखाने असून तिथे काहींनी अतिशय स्वस्तात बॅटी विकत घेतल्या.रस्त्यात बनिहाल येथे लंगर मध्ये गरम धिरडे, पुरी, मसुरीचे वरण,भात,भोपळ्याची भाजी,राजमाची भाजी, शिरा, बालुशाही यासह अनेक पदार्थ घेऊन सर्वांनी भरपेट जेवणं केले.प्रवासा दरम्यान अनेकांनी अमरनाथच्या दर्शना बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी काहीजण गहीवरून गेले होते. सर्वांच्या विनंतीवरून गेल्या २३ वर्षांत अमरनाथ यात्रेत मला आलेले विविध अनुभव मी शेअर केले.
माजी पोलिस निरीक्षक श्री.गणपतसिंह ठाकुर यांनी गडचिरोली येथे नक्षलवादविरोधी टीम मध्ये असताना कोण कोणत्या अनंत अडचणी आल्या आणि त्यावर मात कशी केली याची सविस्तर माहिती आपल्या मनोगतात व्यक्त केली. कुद हे गाव पतीसा या मिठाईसाठी प्रसिद्ध आहे. मुद्दाम हून त्या ठिकाणी गाडी थांबून सर्वांनी घरी नेण्यासाठी मिठाई घेतली. आमच्या सोबत असणारे फोटोग्राफर स्वाती व प्रदीप माळेगाव पाटील यांनी सर्वांसाठी चहा पकोड्याची व्यवस्था केली होती. शासनाने डीए वाढवल्यामुळे जे कर्मचारी आमच्यासोबत होते त्यांनी खुश होऊन प्रत्येकी पाचशे रुपये जमा करून कुठेही नाश्ता द्या असे सांगितले.
यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व हसत खेळत वेळ जावा यासाठी डॉ. स्नेहाराणी मुखेडकर हिने अंताक्षरी चा खेळ घेतला. यात महिला विरुद्ध पुरुष अशी विभागणी करून अंताक्षरीला सुरवात झाली.यात महिलांनी एकापेक्षा एक असे हिंदी चित्रपटातील सरस असे गाणे म्हणून बाजी मारली.रात्री साडेआठच्या सुमारास आम्ही कटऱ्याला पोहोचलो. हॉटेल चिराग इंटरनॅशनल मध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था पाहून सर्वजण खुश झाले.दुसऱ्या दिवशी वैष्णोदेवी ला कसे जायचे याच्या सूचना दिल्या. दरवर्षी आम्हाला जेवण देणारे अमरनाथ यात्रेकरू हृदयनाथ सोनवणे यांच्याकडून चविष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.सकाळी लवकर उठायचे असे ठरवून सर्वजण निद्राधीन झाले. (क्रमशः)