नांदेड| सोशल मिडियावर येणारे बहुतांश मजकूर सध्या नकारात्मक दृष्टिने टाकले जातात, त्याकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांनी सकारात्मक भूमिका ठेवून कार्यरत रहावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या नंदेड दक्षिण ग्रामीण विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची बैठक सोमवारी मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खा.अजि. गोपछडे, आ. जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे, प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश सचिव देविदास राठोड, आ. तुषार राठोड, माजी आ. राम पाटील रातोळीकर आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खा.चव्हाण म्हणाले, विरोधकांनी सुरु केलेल्या खोट्या व नकारात्मक प्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. बेरोजगारांना काम मिळावे यासाठी नांदेड शहरात रोजगार मेळावे घेण्याची गरज आहे, अशा मेळाव्यात युवकांच्या हाताला काम मिळेल. याशिवाय नांदेडमध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे, यासाठीही प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आता कामाला लागा-डॉ.हंबर्डे
बैठकीचे प्रास्ताविक करताना जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी लोकसभा निवडणुकीत जे झाले ते विसरून आता अंग झटकून कामाला लागावे, असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यादहा वर्षांत कोणती कामे केली याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे सांगितले. भारतीय जनता पार्टी ही देशाचा विकास करणारी पार्टी असून 38 पक्ष एकत्र येवूनही विरोधकांना भाजपचा पराभव करता आला नाही, त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ठेवून कामाला लागावे, असे आवाहन डॉ.हंबर्डे यांनी केले.
प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन करून लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव विसरून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, स्व. प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंडे यांनी उभा केलेल्या या पक्षाचे संघटन अधिक सक्षम करावे, असेही ते म्हणाले.
बैठकीस भाजपा राज्यसभा सदस्य खा.डॉ.अजितजी गोपछडे, भाजपा मराठवाडा विभागीय संघटनमंत्री श्री.संजयजी कौडगे, विधान परिषद सदस्य आ.राम पाटील रातोळीकरजी, प्रदेश सदस्य देविदास राठोड,देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री.सुभाषराव साबणे, भाजपा महिला मोर्चाच्या प्रणिताताई देवरे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, माधव पाटील उच्चेकर, माणिकराव लोहगावे, चित्ररेखा गोरे तसेच देगलूर, मुखेड, नायगाव आणि लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व नेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केले तर आभार सरचिटणीस माणिकराव लोहगावे यांनी मानले.