हिमायतनगर, अनिल मादसवार| यावर्षीच्या कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मुख्यमंत्री मा. एकनाथ भाई शिंदे साहेब व त्यांच्या परिवारासोबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या महापूजेचा मान मिळविण्याचे भाग्य पोटा (बु.) येथील मानाचे वारकरी दांपत्य श्री. रामराव बसाजी वालेगावकर व सौ. सुशिलाबाई रामराव वालेगावकर यांना लाभले. या अनोख्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.


या प्रसंगी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते वालेगावकर दांपत्याचा सन्मान करण्यात आला. सत्कार कार्यक्रमास तालुक्यातील व जिल्ह्यातील मान्यवर, वारकरी, संतप्रेमी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात बोलताना आमदार बाबुराव कदम कोहळीकर म्हणाले, “पोटा (बु.) गावासह संपूर्ण तालुका व विधानसभा क्षेत्राचे हे मोठे भाग्य आहे की आपल्या गावातील वारकरी दांपत्याला यंदा विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचा मान मिळाला आहे. त्यांच्या भक्ती, सेवाभाव आणि निष्ठेमुळेच हे यश मिळाले आहे. गेली वीस वर्षे हे दांपत्य निस्वार्थ भावनेने वारी करत आहे. असे वारकरी आपल्या मतदारसंघाचे खरे वैभव आणि भाग्य आहेत.”


यावेळी आमदार कदम यांनी धार्मिक व सामाजिक विकासासंबंधी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यांनी सांगितले की, “पोटा बुद्रुक व पंचक्रोशीतील माळावरील श्री महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल. तसेच श्री दत्त मंदिर, बिरसा मुंडा सभागृह व स्मशानभूमी विकास कामांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल.”


ते पुढे म्हणाले की, “आरोग्य, शिक्षण आणि दोन्ही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून आवश्यक निधी आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे. धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मी कोणतीही कसर ठेवणार नाही.” या प्रसंगी आमदार कदम यांच्यासमवेत जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, विकास पाटील देवसरकर, राजू पाटील, दिगंबर शिरफुले, सत्यव्रत्त ढोले, विनय देशमुख, ज्ञानेश्वर माने, फिरोज कुरेशी, ज्ञानेश्वर पुट्ठेवाड, गजानन हारडफकर, सिद्धेश्वर चव्हाण यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.



सत्कार समारंभाचे आयोजन ज्ञानेश्वर माने पोटेकर, ह.भ.प. मधुकर महाराज पडवळे, ह.भ.प. रामराव महाराज माने (पोटेकर), रामराव जाधव, संदीप देशमुख, कैलास माने, बालाजी महाराज माने, सूर्यकांत माने, नागनाथ वच्चेवाड, तसेच नवतरुण मंडळ, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महापूजेचा मान मिळवून पोटा (बु.) गावाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गाजविणाऱ्या वालेगावकर दांपत्यावर गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन भव्य सत्कार केला. कार्यक्रमस्थळी भाविकांनी “विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल” च्या गजरात वातावरण दुमदुमून गेले. श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचा संगम साधणारा हा सोहळा पोटा (बु.) ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला.


