हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील मुख्य मार्ग असलेल्या उमर चौक येथील कमानी जवळ नळ योजनेच्या कामासाठी गेल्या पाच दिवसापासून खड्डा खोदून ठेवण्यात आला आहे. त्याचा रस्त्याच्या खड्ड्यात गाळ माती टाकल्याने रस्ता चिखलात रुतला आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना व मजुरदार महिला पुरुषांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकजण येथे घसरून पडून जखमी होत आहेत. या प्रकाराकडे नगरपंचायतीचे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. हि बाब लक्षात घेता तात्काळ येथील खोदून ठेवलेल्या रस्ता पूर्वत करून देण्यासाठी नगरपंचायतीने पुढाकार द्यावा अशी मागणी केली जात आहे.
हिमायतनगर शहरात गेल्या पाच सहा वर्षांपासून 19 कोटीच्या पाणीपुरवठा नळयोजनेचे काम सुरू आहे परंतु या योजनेचे काम अजूनही अर्धवट असून, यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. ठेकेदाराने नळ योजनेचे काम करताना काही भागांमध्ये अर्धवट काम ठेवल्यामुळे तसेच जागोजागी नळाची पाईपलाईन लिकेज असल्यामुळे नळ योजनेचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नाही. एवढेच नाहीत तर पाईपलाईन साठी शहरातील अनेक भागातील सिमेंट रस्ते जागो जागो फोडून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे अल्पसा पाऊस पडताच ठिकठिकाणी रस्त्याच्या मध्ये खोदून ठेवलेल्या नाल्यामध्ये पाणी साचून वाहतुकीला आणि पैदान जाणार्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे.
मुख्य बाजारपेठ आणि उमरचौक कमानीजवळ या रस्त्यामुळे अल्पसा पाऊस होताच चिखल निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक व वाहनधारक नळयोजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या नाकर्तेपणा बाबत आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणा बाबत नाराजी व्यक्त करत आहेत. गेल्या पाच दिवसापूर्वी शहरातील उमर चौक भागात नळ योजनेच्या पाईपलाईन कामासाठी पर्यायी व्यवस्था न ठेवता नाली खोदून ठेवली. त्यामुळे या भागातील हातावर पोट असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठे गंडांतर आले आहे. तसेच शाळा सुरू होऊन आठ दिवस झाले शाळेला ये जा करताना या ठिकाणाहून चिमुकल्या बालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा बालकांना शाळेत जाताना घसरगुंडी होऊन जमीनिवर पडावे लागत असल्याने पालक वर्गातून ठेकेदार व नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही बाब लक्षात घेता तातडीने येथे खोदून ठेवलेल्या रस्त्यात मुरूम टाकून देऊन चिखल होणार नाही याची काळजी घेत रस्ता पूर्ववत करावा अन्यथा या भागातील नागरिक नगरपंचायतवर ठेकेदाराच्या विरोधात धडक मोर्चा नेण्याच्या तयारीत आहेत.