देगलूर, गंगाधर मठवाले l आभाळ कोसळले, नद्या तुडुंब वाहिल्या, शेतमाल वाहून गेला, घरे उद्ध्वस्त झाली. हसनाळ, रावणगांव, भिंगोली, भेंडेगाव, मारजवाडी, रावी, सावळी आदी गावांत प्रत्येक कुटुंबाच्या संसारावर आपत्तीचे सावट दाटून आले. अश्रूंनी डोळे भरून गेले, रिकाम्या हातांनी माणूस हतबल झाला. अशा वेळी जेव्हा आधाराची आस लागली होती, तेव्हा धावून आलेले हात होते रामदास पाटील मित्र परिवाराचे.


संकट कितीही मोठं असो, मग ते कोरोना असो की अतिवृष्टीचे प्रचंड संकट या मित्र परिवाराने सेवा भावाचा मार्ग कधीच सोडला नाही. दिवस-रात्र झटत त्यांनी प्रत्येक गावात पोहोचून गरजूंच्या ओठांवर दिलासा उमटवला. कुठे अन्नधान्यकिट पोहोचवले, कुठे तांदूळ, तेल व आवश्यक साहित्य दिलं, तर कुठे खिचडी शिजवून शेकडो लोकांच्या हातात गरम थाळी दिली. रावी गावात पन्नासहून अधिक कुटुंबांना आधार दिला, तर हसनाळ, रावणगाव व परिसरातील जवळपास 400 कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचला.



ही मदत काही एका व्यक्तीची नव्हे, तर एका कुटुंबासारख्या मित्र परिवाराच्या सामूहिक जिव्हाळ्याची होती. यात ज्ञानेश्वर सुरनरं, सरपंच योगेश देवकते, गोविंद धुळगंडे, सीताराम बडगणे, बबन बदगणे, बालाजी येळगे, गनपत गोडाजी, खूशाल कोहे, संतोष बिरादार, प्रदीप पाटील, बालाजी ढोसने, बालाजी पाटील, पप्पू रावणगांवकर, केरूरकर पाटील, दिनेश आवडके व त्यांची टीम, सद्दाम कोतवाल, विजय राठोड, निळकंट पाटील, राम साळवेश्वर, सदा घाले, नितीन टोकलवाड, तुकाराम सूडके, रमाकांत पाटील, दिनेश पाटील, श्रीकांत काळे, अनिल बल्लेवर, प्रसाद देवणे, जलील भाई, चंद्रशेखर पाटील, बळवंत पाटील, सुधाकर सुरनरं आदी अनेक कार्यकर्त्यांनी आपला जीव ओतून सेवा केली.


कुणी रात्रीभर किट तयार केले, कुणी वाहतुकीची जबाबदारी घेतली, कुणी घराघरांत पोहोचून आई-बापांच्या डोळ्यातील आसवं पुसली, तर कुणी लहानग्यांच्या हातात दिलासा देणारी थाळी दिली. ही केवळ मदत नव्हती, तर संकटात उमटलेला आशेचा किरण होता. “जनतेची सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या विचाराने प्रेरित होऊन या मित्र परिवाराने केलेले कार्य म्हणजे खऱ्या समाजधर्माचे पालन आहे.

“कोरोना संकट असो वा अतिवृष्टी, माझा मित्र परिवार सेवेत सदैव खंबीर उभा राहिला आहे. आज प्रत्येक कणभर मदत पूरग्रस्तांच्या जीवनात दिलासा ठरते. म्हणूनच राज्यातील सर्व दानशूर संस्था, समाजसेवक व नागरिकांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा. हीच खरी लोकसेवा आहे.”रामदास पाटील सुमठाणकर


