नांदेड | हवामानातील अचानक बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, डोकेदुखी व घसा खवखवणे यांसारख्या आजारांत लक्षणीय वाढ झाली आहे.


मात्र या आजारांवर उपचार करताना अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट किराणा दुकाने व पानटपऱ्यांमधून औषधे खरेदी करून सेवन करत असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. ही बाब आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून, अशा प्रकारे औषधांचे सेवन जीवावर बेतू शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी सांगितले की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय व अधिकृत औषध विक्रेत्यांशिवाय इतर ठिकाणांहून औषधे घेणे हे मानवी शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. चुकीचे औषध, चुकीचा डोस किंवा बनावट औषधे यामुळे आजार बळावण्यासह दुरगामी दुष्परिणाम होण्याचा धोका वाढतो.


विशेष म्हणजे, किराणा दुकाने, पानटपऱ्या किंवा तत्सम आस्थापनांकडून सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी यावरील औषधांची विक्री करणे हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि नियम १९४५ चे थेट उल्लंघन आहे. अशा प्रकारची विक्री अथवा खरेदी आढळून आल्यास संबंधित विक्रेत्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. खरेदी फक्त परवानाधारक औषध विक्रेत्यांकडूनच करावी. किराणा दुकाने, पानटपऱ्या किंवा अनधिकृत विक्रेत्यांकडून औषधे घेणे टाळावे
दरम्यान, नांदेड जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांनाही सर्व किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांना कायद्याच्या चौकटीत राहूनच औषधांची विक्री व वितरण करण्याबाबत कठोर सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.स्वतःच्या आरोग्याशी तडजोड नको – डॉक्टरांचा सल्ला घ्या, अधिकृत औषध दुकानातूनच औषधे घ्या!

