नांदेड| अनेक विद्यार्थ्यांना आणि समवयस्क मित्रांना प्रोत्साहन देऊन विविध चळवळीत भाग घेणारे आणि गोवा मुक्ती संग्रामातील अग्रणी आणि धाडसी व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय बसवंतराव मुंडकर हे होत. असे प्रतिपादन बिलोली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, काळा मारुती संस्थानचे प्रमुख तथा सेवानिवृत्त शिक्षक शामरावजी इनामदार यांनी केले.
ते स्वर्गीय बसवंतराव मुंडकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आणि “बाबा तुमच्यासाठी… !” आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी आणि पोलीस उपाधीक्षक श्री संकेत गोस्वामी यांची उपस्थिती होती. बाबा तुमच्यासाठी या उपक्रमात धर्माबाद तालुक्यात संगम येथे, बिलोली शहरात आणि देगलूर तालुक्यातील होट्टल येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
इनामदार पुढे म्हणाले की, गोवा पोर्तुगीज यांच्या ताब्यात होता. तेथे होणारे हिंदू वरील अत्याचार, मोठ्या प्रमाणात होणारे हत्याकांड आणि जबरदस्ती धर्मांतर या बाबीमुळे अनेकांच्या मनात संताप निर्माण होत होता. असाच तीव्र संताप निर्माण झालेले स्वर्गीय बसवंतराव परमेश्वरराव मुंडकर यांनी गोवा मुक्ती संग्रामासाठी तीव्र आंदोलन केले. त्यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात मीही माझ्या इयत्ता चौथीच्या मित्रांसह सहभागी झालो होतो. स्वर्गीय बसवंतराव हे बलदंड शरीराचे आणि धाडसी प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते. श्री इनामदार पुढे असेही म्हणाले की,माझ्यात अंगभूत असलेली भाषण कला, धाडसाच्या अभावी अभिव्यक्त होत नव्हती. व्यासपीठाचे धाडस निर्माण करण्याबरोबरच, भाषण कला विकसित करण्यासाठी त्यांचे प्रोत्साहन खूप कामी आले. असेही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी श्री सचिन गिरी आणि पोलीस उपाधीक्षक श्री संकेत गोस्वामी, जिल्हा युवा अधिकारी चंदाताई रावळकर यांचे समायोजित भाषण झाले. या कार्यक्रमासाठी धर्माबाद, बिलोली आणि देगलूर तालुक्यातील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद मुंडकर यांनी केले तर आभार विठ्ठल पाटील यांनी व्यक्त केले.