हिमायतनगर (अनिल मादसवार) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मौजे वीरसनी, ता. हिमायतनगर येथे दहा टक्के महिला व बालकल्याण निधीतून भव्य महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर ग्रामपंचायत वीरसनी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सरसम यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडले.


या शिबिरात गावातील किशोरवयीन मुली, 19 ते 49 वयोगटातील महिला, ज्येष्ठ नागरिक, बालके व पुरुष यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषतः महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्यक औषधोपचार ग्रामपंचायत वीरसनीकडून मोफत पुरविण्यात आले.

प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. नकाते यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी वीरसनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा आदर्श घ्यावा. गावातील आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सातत्याने अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.”



याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड काढणे, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती व स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरात डॉ. परभणीकर, डॉ. टारपे, डॉ. मिजकर, डॉ. खाडे, तसेच श्री नागमवाड, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र वीरसनी व जवळगाव येथील संपूर्ण वैद्यकीय पथकाने मोलाचे सहकार्य केले. या शिबिरात जवळपास 300 पेक्षा अधिक महिलांची व 200 हून अधिक बालक व पुरुषांची तपासणी करून औषधे देण्यात आली.


ग्रामपंचायत वीरसनीने या अभियानाअंतर्गत अॅनिमिया मुक्त गाव करण्याचा संकल्प केला असून, आजच्या शिबिरात 218 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित महिलांची तपासणी पुढील तीन दिवसांत करण्यात येणार आहे.
यावेळी गटविकास अधिकारी श्री नारवटकर यांनी मौजे वीरसनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात नाविन्यपूर्ण काम करत असल्याचे सांगून कौतुक केले. तसेच ग्रामपंचायत वीरसनी व समस्त ग्रामस्थांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून गावाच्या विकासात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे नमूद केले.
या अभियानाअंतर्गत गावात कर वसुली, लोकसहभाग, शाळा व अंगणवाडी डिजिटल करणे, अभ्यासिका उभारणे, पोषण बाग तयार करणे, शासकीय इमारतींवर सोलार बसविणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, पांदण रस्त्यांची दुरुस्ती व कच्च्या रस्त्यांचे सीसीकरण आदी विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
या आरोग्य शिबिरास गटविकास अधिकारी श्री नारवटकर (पंचायत समिती हिमायतनगर) व विस्तार अधिकारी श्री प्रमोद टारपे यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी श्री वडजकर हे अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत.

