उस्माननगर | लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कलंबर बु. येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १८ जानेवारी रोजी सकाळी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


मृत शेतकऱ्याचे नाव गंगाधर गणेश मैलारे (वय ५१) असे असून, ते दररोजप्रमाणे आपल्या शेतातील गहू व हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप (मोटार) सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले होते. यावेळी विहिरीच्या कडेला चालत असताना पाय घसरून तोल गेल्याने ते थेट विहिरीतील पाण्यात पडले. ही घटना सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली.

सध्या महावितरणकडून अचानक बदलत्या वेळेत विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना कधी सकाळी तर कधी दुपारी पाणी द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी झोपेतून उठून घाईघाईने शेतात जात असल्याचे चित्र आहे. अशाच परिस्थितीत ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात आहे.


घटनेची माहिती मिळताच उस्माननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मृतदेह बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्र, उस्माननगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा कलंबर बु. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मृत शेतकरी गंगाधर मैलारे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा मोठा परिवार असून, त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप व हळहळ व्यक्त केली जात आहे.

