देगलूर, गंगाधर मठवाले| शहरासह तालुक्यात सोमवार ता .२१ रोजी दुपारनंतर हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण झाले होते. काही भागात पाऊसही झाला त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले. दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस झाल्याने शेतावर फवारणीस गेलेल्या शेतमजुराच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाला. हि घटना देगलूर तालुक्यातील शेळगाव नरसिंह येथे सोमवारी दुपारी १२:३० च्या दरम्यान घडली.
देगलूर तालुक्याच्या ग्रामीण भागात दुपारनंतर वातावरणात बदल झाला. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मोठा पाऊस झाला. यामुळे शेतातील पिकांची नुकसान झाले .तमलुर, शेळगाव ,मेदनकल्लूर,शेवाळा, सांगवी या भागात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेळगाव नरसिंह येथील बसवंत मारुती गुडफळे ( वय ४०) हा शेतमजूर शेतावर फवारणीचे काम करीत असताना अचानक अंगावर विज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. प्रशासनातर्फे पंचनामा करण्यात आला असून शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले .मयत बसवंत गुडफळे या शेतमजुराची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून कुटुंबाला शासनाच्या वतीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी माजी सरपंच सुरेश मिसाळे यांनी केली आहे.