हिमायतनगर, बाबाराव जरगेवाड| हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथे शुक्रवार दिनांक 26 रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात वीज कोसळून एक दुर्दैवी घटना घडली आहे. कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या गट क्र. 212 शिवारातील गोठ्यावर वीज कोसळल्याने एका वासराचा मृत्यू झाला.


याचसोबत शेतातील महत्त्वाचे साहित्य जसे की, मोटारपंप, खत, पाईप, स्प्रिंकलर इत्यादी पूर्णपणे जळून खाक झाले. त्यामुळे संबंधित शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. हिमायतनगर तालुका सह बोरगडी परिसरात जोरदार पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू असून, मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह राज्यभरात वीज व पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

एकूणच अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून कष्टकरी शेतकऱ्यांना सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे उभे राहणे कठीण झाले आहे. शेती नुकसानीसह वीज पडून झालेल्या नुकसानीबाबत संबंधित शेतकऱ्याच्या आखाड्याचा तात्काळ पंचनामा करून योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.



