किनवट /शिवणी, भोजराज देशमुख| किनवट तालुक्यातील इस्लापूर सर्कल अंतर्गत येणाऱ्या शिवणी गावात माकडांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, माकडांच्या हल्ल्यात चंद्रकलाबाई गंगाधर कट्टलवाड (वय ६०, रा. शिवणी) या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू असून या घटनेमुळे गावात महिला-पुरुषांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शिवणी गावात गेल्या काही वर्षांपासून माकडांचा उपद्रव वाढत असून, याआधीही महिला, पुरुष व लहान मुलांवर माकडांनी हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, चंद्रकलाबाई कट्टलवाड या महिलेच्या गंभीर जखमी होण्याच्या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

महिला व लहान मुलांमध्ये भीती
गावातील मुख्य रस्ते, वस्ती परिसर, आठवडी बाजार तसेच शासकीय कार्यालयांच्या परिसरात माकडांचे टोळके मुक्तपणे वावरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माकडांकडून अचानक हल्ले, वृद्ध व लहान मुलांना घाबरवणे, घरांवरील पत्रे-कौले, पाण्याच्या टाक्या तसेच विद्युत वाहिन्यांचे नुकसान अशा घटना सातत्याने घडत आहेत.


विशेषतः सकाळी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना माकडांच्या भीतीने घरातच थांबावे लागत आहे. महिलांना घरातील कामकाज करताना, बाथरूमजवळ माकडे येत असल्याने प्रचंड भीती वाटत आहे. काही ठिकाणी माकडे थेट घरात घुसत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

आठवडी बाजारालाही फटका
आठवडी बाजारात बसणाऱ्या फळविक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांना माकडांच्या उपद्रवाचा मोठा फटका बसत आहे. माकडे फळे हिसकावून नेत असल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. काही वेळा माकडांच्या हल्ल्यामुळे बाजारात गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे.
वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप
या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने अनेक वेळा वनविभागाकडे तोंडी व लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने वनविभाग ‘मूग गिळून गप्प’ असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कारवाईअभावी माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांनी वनविभागाने तात्काळ दखल घेऊन उपद्रवी माकडांना पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडावे, तसेच भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी केली आहे. वेळेत बंदोबस्त न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
माकडांचा बंदोबस्त करू – वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे
शिवणी येथील महिला चंद्रकलाबाई गंगाधर कट्टलवाड या माकडांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच अप्पारावपेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी उमेश ढगे यांनी रविवारी त्यांच्या घरी भेट देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या नांदेड येथे उपचार घेत असल्याने त्यांनी त्यांच्या मुलांशी दूरध्वनीवर सविस्तर चर्चा केली.यावेळी गावातील माकडांचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे आश्वासन वनपरिक्षेत्र अधिकारी ढगे यांनी दिले.

