
नांदेड| प्रशासनाचा कणा असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले आहे. शासनाच्या पथदर्शी व अभिनव योजनांचा प्रचार, प्रसार व अंमलबजावणी ही या सप्ताहाची वैशिष्ट्ये असणार आहे.


महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तालुकास्तरावर समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये एक ऑगस्टला शुभारंभ सप्ताह कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दोन ऑगस्टला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तीन ऑगस्टला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, 4 ऑगस्टला स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, पाच ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी, 6 ऑगस्ट ला एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा, तर सात ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद, उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताह सांगता समारंभ घेण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त शासन व सामान्य नागरिक यांना जोडणाऱ्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. यामध्ये महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या सप्ताहात हीरहिरीने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले.


मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेच्या अर्जात त्रुटीची पूर्तता करण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदतवाढ
अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबतची योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेच्या अटी व शर्ती निश्चित केलेल्या आहेत. या योजनेचे प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयास प्राप्त झाले असून 17 जुलै 2024 रोजी त्रुटी पुर्ततेसाठी संबंधीत अर्जदाराच्या भ्रमणध्वनीवर 25 जुलै 2024 रोजीपर्यंत त्रुटी पूर्तता करण्याबाबत कळविण्यात आले होते.

परंतु विविध संघटनानी दिलेली तारीख पुन्हा वाढवून मिळणेबाबत या कार्यालयास विनंती केली आहे. त्यासाठी अनुसूचित व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांचा पुरवठा करणे या योजनेच्या अर्जात त्रुटीची पुर्तता करण्यासाठी विविध संघटनांच्या विनंतीनुसार 31 जुलै 2024 पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. सदरची मुदतवाढ ही अंतिम असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.



