हिमायतनगर, अनिल मादसवार| पाऊस पाणी चांगला पडू दे.. शेतकऱ्यांची घरे धनधान्याने भरू दे… सर्वाना सुख समृद्ध ठेव असे साकडे घालत आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरातील विठ्ठल रुक्माई व श्री परमेश्वराचं दर्शनासाठी सकाळपासून हजारो भाविक भक्तांनी गर्दी केली होती.
आषाढी एकादशी म्हणजे वारकरी संप्रदायातील महिलां – पुरुषांसाठी आनंदाची पर्वणी आहे. साक्षात विठू माऊलींचे दर्शन घेऊन जीवन सफल करण्याच्या उद्देशाने लाखो भक्त पंढरपूरला रवाना होतात. आणि देव शयनी एकादशीच्या पावन पर्वावर उपवास धरतात. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधुन ॐ कार संस्था पुणे निर्मित प्रस्तुत ” पंढरीची वारी ” या अभंगवाणी व भक्ती संगीताचा विशेष कार्यक्रम हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरातील सभागृहात दुपारी 2 ते 4.30 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
सकाळी सहा वाजता पुरोहित कांतागुरु यांच्या मधुर वाणीत संचालक संजय माने यांनी सपत्नीक श्री परमेश्वर व विठू माऊलीचा अभिषेक व पूजा केली. आषाढी निमित्ताने येथील शिवभक्त सुनंदा दासेवार व त्यांच्या सहकारी महिलांच्या वतीने पंढरपूरच्या विठुराया प्रमाणे श्री परमेश्वराच्या मूर्तीला सजविण्यात आले. टोप, वस्त्र, फुलांचा हार, दागिन्यांचा हार, तुळशी माळ आदी साहित्याचा वापर सजावटीसाठी करण्यात आला. तसेच महाआरती झाल्यानंतर हजारो भावी भक्तांनी जय जय राम कृष्ण हरी… विठ्ठल विठ्ठल म्हणत हरिनामाचा गजर… श्रीचा जयजयकार करत श्री परमेश्वर आणि विठुरायाच्या दर्शनासाठी महिला पुरुषांनी एकच गर्दी केली होती.
परंपरेपासून चालत आलेल्या रीतीप्रमाणे हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने सायंकाळी ५ वाजता शहरातील मुख्य रस्त्याने टाळ मृदंगाच्या वाणीत नगरप्रदक्षिणा दिंडी काढून पंढरपूरला वारी गेल्याचा अनुभव घेतला जातो. यामध्ये हजारो महिला भावीकी भक्त, वारकरी संप्रदायाचे लोक सहभागी होतात. ज्यांना पंढरपूरला जाता येत नाही ते हिमायतनगर वाढोण्याच्या परमेश्वर मंदिरातर्फे आयोजित नगरप्रदक्षिणा दिंडीत सहभागी होऊन शहरातील सर्व देवी देवतांचे दर्शन घेतात. टाळ – मृदंगाच्या वाणीत हरी नामाचा गजर करत निघालेली नगरप्रदक्षिणा दिंडी परत श्री परमेश्वर मंदिरात आल्यानंतर समारोप केला जातो.
त्याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासून श्री परमेश्वर मंदिरातील विठू माऊली व श्रींचे दर्शन घेण्यासाठी महिला भाविकांनी सकाळपासून गर्दी केली असल्याचे पाहावयास मिळाले आहे. सायंकाळी शहरातून काढल्या जाणाऱ्या नगरप्रदक्षिणा दिंडीत महिला पुरुष भाविकांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्यासह संचालक मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे.